Training of new teachers during Diwali holidays
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नवनियुक्त शिक्षकांना एक आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. परंतु त्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधण्यात आला. त्यामुळे नवनियुक्त शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशिक्षणाच्या नियोजनात बदल करावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी शिक्षक आमदारांकडे केली आहे.
२५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत नवनियुक्त शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यात यावे, असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दि. ३ ऑक्टोबरच्या पत्राद्वारे दिले आहे. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी दि. २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदा सहा दिवसांची दिवाळी आहे.
दि. २५ पासून एक आठवड्याचे प्रशिक्षण ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये येत असल्याने ते शिक्षकांसाठी अडचणीचे ठरत आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य संस्था पवित्र शिक्षक संघाने वेगवेगळ्या विभागातील शिक्षक आमदारांना निवेदन देऊन कालावधीत बदल करण्याची मागणी केली आहे. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या बहुतांश शिक्षकांची नेमणूक त्यांच्या गावापासून दूर झाली आहे.
त्यामुळे दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कुटुंबीयांना भेटण्याची त्यांच्याबरोबर दिवाळी आनंद घेण्याची संधी मिळत नाही. तसेच या वर्षी सुट्यांचा कालावधी कमी आहे. अतिवृष्टीमुळे गावोगाव प्रचंड नुकसान झाले आहे. या सुट्यात प्रशिक्षण ठेवल्याने अतिवृष्टीने विस्कळीत झालेले कुटुंब स्थिर स्थावर करण्यास वेळ मिळत नाही. ही पार्श्वभूमी शिक्षक आमदारांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान नवनियुक्त शिक्षकांच्या या अडचणीची दखल घेऊन त्यांना आ. सत्यजित तांबे, आ. जयंत आजगावकर, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. कपिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला पत्र लिहून प्रशिक्षणाच्या कालावधीत बदल करण्याची शिफारस केली आहे.