येडशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद झाला  (Pudhari Photo)
नांदेड

Tiger Migration | टिपेश्वरमधील आणखी एका वाघाचे मराठवाड्यात स्थलांतर: ७०० किमीचे अंतर कापत पोहोचला धाराशिव जिल्ह्यात

Tipeshwar Wildlife Sanctuary | येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्यात हा वाघ स्थिरावला

पुढारी वृत्तसेवा

Tiger travelled 700 km in Dharashiv

प्रशांत भागवत

उमरखेड : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघाने तब्बल ६०० ते ७०० किलोमीटरचे अंतर कापून धाराशिव जिल्हा गाठला आहे. जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्यात हा वाघ स्थिरावला आहे. यापूर्वी देखील संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात टिपेश्वरचा वाघ स्थिरावला आहे. गेल्या काही वर्षात अनेक वाघ यवतमाळ जिल्ह्यातून स्थलांतरित झाले असून ,चार वाघांच्या स्थलांतरणाची अधिकृत नोंद आहे.

जिल्ह्याचे विशेषतः टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र वाघांच्या आधिवासांसाठी कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाघांचे स्थलांतर होत आहे. दरम्यान प्रस्तावित, "टिपेश्वर,व पैनगंगा" या दोन्ही अभयारण्याला जोडणाऱ्या कॅरीडॉर ची त्वरीत अंमलबजावणी झाल्यास हे स्थलांतर रोखण्यास मदत होणार आहे.

मे २०२३ मध्ये 'तारु' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन वर्षाच्या वाघाने स्थलांतरणाचा प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान हा वाघ तेलंगणातील आदिलाबादमध्ये भटकला. त्यानंतर पैनगंगा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये त्याने प्रवेश केला.

दरम्यान, या वाघाला 'रेडिओ कॉलर' लावून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात त्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला. त्यासाठी जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत तब्बल ७५ दिवस मोहीम राबवण्यात आली. मात्र, हा वाघ वनखात्यातील अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी काहीवेळा ड्रोनचा देखील वापर करण्यात आला. यावेळी तो दोन-तीन वेळाच दिसला, पण अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात वाघ यशस्वी ठरला. त्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली.

मात्र, आता हा वाघ आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये भटकंती करत असला तरीही धाराशिव जिल्ह्यातील २२.५० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात स्थिरावला आहे. याठिकाणी त्याला आवश्यक असणारे भक्ष्य देखील मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात 'तारु' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचे नामकरण आता 'रामलिंग' असे करण्यात आले आहे. येडशीमध्ये या वाघाने प्रवेश केल्यानंतर कॅमेरा ट्रॅपमधील त्याचे छायाचित्र टिपेश्वरमधील त्याच्या पूर्वीच्या छायाचित्रांशी जुळवण्यात आले. भविष्यातील वाघाच्या निरोगी पिढीसाठी वाघांचे स्थलांतर महत्त्वाचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT