Nanded News : तीन वेळा कर्ज माफी, मात्र फायदा झाला नाही; गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन file photo
नांदेड

Nanded News : तीन वेळा कर्ज माफी, मात्र फायदा झाला नाही; गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; ढसाढसा रडत सरकारकडे मांडली व्यथा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : तीन वेळा कर्ज माफी झाली मात्र, एकदाही यादीत फायदा मिळाला नाही. मी आत्महत्या करतोय," असा टाहो फोडत नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी शंकर आबाराव क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.१९) थेट सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे आपली व्यथा मांडत गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

प्रशासनाने आपल्या व्येथेची दखल घ्यावी आणि लेकीच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी त्यांनी व्हिडिओ करून अखेरचा टाहो फोडला होता; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या दुर्दैवी घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तीनदा कर्जमाफी, पण मदतीपासून कोसो दूर

नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथील शंकर क्षीरसागर हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती करून कुटुंबाचा गाडा चालवणारे अल्पभूधारक शेतकरी होते. यंदाच्या हंगामात त्यांनी सोयाबीनचे पीक घेतले होते, परंतु पावसाच्या दीर्घ खंडामुळे ते पूर्णपणे वाया गेले. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे ते हवालदिल झाले होते.

शासनाकडून वेळोवेळी कर्जमाफीची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात गरजूंपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही. याच त्रस्ततेतून त्यांनी मोबाईल कॅमेरा सुरू करून थेट शासनाला साकडे घातले. "तीन वेळा कर्जमाफी झाली, पण एकाही कर्जमाफीच्या यादीत माझे नाव आले नाही," अशी हतबलता व्यक्त करताना त्यांना आश्रू अनावर झाले. त्यांचे हे आश्रू शासन प्रशासनाच्या धोरणांची पोलखोल करत होते.

ढसाढसा रडत मांडली व्यथा..

आत्महत्या करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओत शंकर क्षीरसागर हे अत्यंत भावुक झाले होते. ढसाढसा रडत ते म्हणाले "कलेक्टर साहेब, मी विनंती करतो. कर्जमाफी झालीच पाहिजे. एकाही कर्जमाफीच्या योजनेत माझे नाव आले नाही. त्यामुळे मी आज आत्महत्या करतोय." त्यांची ही हाक सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली; मात्र नातेवाईक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी शेतात गळफास लावून आपले जीवन संपवले होते.

वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा अनावर ताण

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन विविध योजनांचे दावे करते, मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री पूर्तता करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची दमछाक होते. शंकर क्षीरसागर यांची मुलगी शिवानी ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुलीला डॉक्टर बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते, त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. शासनाने वैद्यकीय शिक्षण मोफत केल्याच्या घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात फी माफीसाठी अर्ज करूनही शिवानीची फी माफ झाली नाही. याच विवंचनेत त्यांनी व्हिडिओमध्ये याचा जाबही प्रशासनाला विचारला.

शासन म्हणते मेडिकल मोफत, मग माझी लेक वंचित का?

सोशल मीडियावरील व्हिडिओत संताप आणि वेदना व्यक्त करताना शंकर क्षीरसागर म्हणाले, "शासन म्हणते विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले, पण कुठे माफ झाले सांगा बरं? माझी मुलगी मेडिकलला शिकतेय, फी माफीसाठी अर्ज करूनही ती झाली नाही. तुम्ही आमची विनंती गांभीर्याने घेऊन चौकशी करा." लेकीच्या शिक्षणाचा खर्च आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा पेलवत नाही. असे हताश झालेल्या या बापाने व्हिडिओद्वारे सरकारकडे दाद मागितली खरी, पण व्यवस्थेच्या उदासीनतेने एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी केली. लिंबगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, या दुर्घटनेमुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT