Three arrested, including a mangalsutra thief; stolen property worth ₹1.5 lakh seized
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत एका आरोपीसह त्याच्या साथीदाराला आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीचे १० ग्रॅम सोन्याचे लगट, एक लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
५ ऑगस्ट रोजी बसवेश्वर चौक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपी आदर्श ऊर्फ कुणाल श्रीराम लालमे (वय १९, रा. विष्णुनगर) यास पुणे येथून ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार साईनाथ रमेश वाघमारे (वय २१) व एका बालकाला ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या चौकशीतून मंगळसूत्र चोरीसह, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरी आणि सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील घरफोडीतील लॅपटॉप चोरी अशा एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.