There is no record of the land of the Shri Dutt Shikhar Sansthan
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : येथील श्रीदत्त शिखर संस्थानची हजारो हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी अधिकांश जमिनीची परिशिष्ट १ला नोंदच नाही. त्यामुळे काही शेतजमीनी परस्पर व बेकायदेशीररीत्या विकल्या गेल्या आहेत. त्यास विश्वस्त समितीची अनास्था कारणीभूत असल्याने त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी न्यायालयीन वादात असलेले विश्वस्त गोपाळ भारती यांनी धर्मदाय आयुक्त मुंबई यांना पाठविलेल्या अनेक निवेदनातून केली आहे.
गोपाळ भारती यांनी सन २०२२ ते ऑक्टों. २०२५ या कालावधीत मुंबई स्थित धर्मदाय आयुक्तांना पाठविलेल्या १० निवेदनातून यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिंदोला येथील १०० हेक्टर जमिनीचे एका सिमेंट कंपनीला बेकायदेशीररीत्या हस्तांतरण केल्याचे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाल्याची बाब उजागर केली आहे.
तसेच तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी १९८७साली संस्थानच्या उपरोक्त जमीन सिमेंट कंपनीसाठी संपादित केली कशी?, त्यापोटी संस्थानला ६० टक्के तर कुळाच्या वारसदारांना ४० टक्के लाभ दिला कसा?, संस्थान व कुळाने तो घेतला कसा?, ३० जुलै २०१० च्या शासकीय आदेशानुसार संस्थानच्या बेकायदेशीररित्या हस्तांतरित झाल्यात त्या पूर्ववत संस्थानच्या नावे करण्याची प्रक्रियाची प्रक्रिया सुरू आहे, परंतु नोंदणी झाल्यापासून आजतागायत संस्थानच्या बऱ्याच इनामी जमिनीच्या परिशिष्ट १ ला नोंदी का नाहीत?,
उपरोक्त जमीन विक्री व हस्तांतरण करतांना न्यासाने धर्मदाय आयुक्तांची परवानगी का घेतली नाही?, याशिवाय संस्थांनच्या हिताला बाधक ठरणाऱ्या विश्वस्तांची चौकशी व कार्यवाही का होत नाही? असे अनेक प्रश्न भारती यांनी धर्मदाय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात उपस्थित केले आहेत.