The wedding is eight days away, and the groom found in a red light area
हदगाव : पुढारी वृत्तसेवा
हळद लागायच्या आधीच बेड्या पडल्या अशी काहीशी अवस्था एका नियोजित नवरदेवाची झाली आहे. अवघ्या आठ दिवसांवर (१६ डिसेंबर) लग्न असलेल्या आणि शहरात लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला चक्क कुंटणखान्यावरून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हदगाव येथील नवी आबादी परिसरातील वाजपेयी नगरात अर्धापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे, हदगाव पोलिसांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध प्रकारावर कारवाई करण्यासाठी थेट - अर्धापूर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने स्थानिक पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांना हदगाव शहरातील दत्तबर्डी आणि नवी आबादी (वाजपेयी नगर) भागात काही महिलांना डांबून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने त्यांनी या मोहिमेची जबाबदारी अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यावर सोपवली. कदम यांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री अचानक धाड टाकली असता, तिथे १० जण आढळून आले.
तीन वेळा कारवाई, तरीही धंदा सुरूच कसा?
ज्या ठिकाणी ही धाड टाकण्यात आली, त्या अनुधावर यापूर्वीही पोलिसांनी ३ वेळा कारवाई केली आहे. तरीही काही दिवसांतच हा बाजार पुन्हा सुरू होतो. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. या परिसरातील सभ्य नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार या प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रिका वाटप राहिले बाजूला, नवरदेव निघाला कोठडीला !
येत्या १६ डिसेंबरला बोहल्यावर चढणाऱ्या तरुणाचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे. लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी आणि नातेवाईकांना पत्रिका वाटण्यासाठी हा तरुण हदगावात आला होता. मात्र, मित्रमंडळींच्या नादाला लागून तो वाजपेयी नगरातील कुंटणखान्यावर पोहोचला. दुर्दैवाने त्याच वेळी अर्धापूर पोलिसांनी धाड टाकली आणि नवरदेव पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आता शुभमंगल होण्याऐवजी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद झाल्याने तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी चर्चा शहरात रंगली आहे.