The person who kidnapped the two was arrested.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दोघांचे अपहरण करणाऱ्या एका आरोपीला अवघ्या सहा तासात ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले शुक्रवारी ही घटना घडली. अपहरण झालेल्या दोघांचीही मुक्तता करण्यात आली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरात रा-हणाऱ्या दोघांनी वनविभागात नोकरी लावतो म्हणून पैसे उकळले होते. नोकरी न लागल्याने पैशांचा तगादा लावल्यानंतर मध्यस्थी असलेल्या विलास हंडे, रावसाहेब शेकडे या दोघांना काही जणांनी धमकी दिली होती. वनविभागात नोकरी कशी लागली नाही असे म्हणत सुनिल बंडू साबळे (रा. पुसद), अविनाश दत्ता मोहिते (रा. सांडवा, पुसद), राजू मंदाळे (रा. हेगडी ता. पुसद) व विकास नरहरी खराटे (रा. धरमवाडी ता. पुसद) या चौघांनी विलास हंडे व रावसाहेब शेकडे या दोघांचे १ ऑगस्ट रोजी अपहरण केले.
लातूर फाटाजवळील पेट्रोल पंपाजवळ हे अपहरण नाट्य घडल्यानंतर एका महिलेने सिडको पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. घटनेचे गांर्भिय लक्षात घेऊन स्वतः पोलीस निरीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत व तांत्रिक कौशल्याचा वापर करत अपहरण झालेल्या दोन व्यक्तींना शोधून त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अन्य तीन आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी व्यक्त केला. चार दिवसांपूर्वी एका अपहरत तरुणीची अवघ्या दोन तासांत मुक्तता करणाऱ्या नांदेड पोलिसांनी या गंभिर गुन्ह्याचा तपास अत्यंत शिताफिने व तांत्रिक कौशल्य वापरून केला.
आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे पोउपनि बाबूराव चव्हाण, विक्रम वाकडे, राजेंद्र शिटीकर, दिपक ओढणे, बेग, भिसे, शिरगीरे, कदम, माळगे व शिरमलवार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.