The mastermind behind the fake birth certificate case in Nanded district is from Bihar
संतोष जोशी
नांदेड : देशातील कारभार पारदर्शक व्हावा आणि देशातील प्रत्येक नागरिकांना स्वतःचे हक्क मिळावेत, कामे लवकर व सुरळीत व्हावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने डिजिटल पध्दत अवलंबिली. या डिजिटल पध्दतीमुळे आज लोकांना फायदा तर होत आहे. मात्र, याचा गैरफायदा उचलणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
नांदेड जिल्ह्यातील एकाच गावात १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंड येथून पाच जणांना अटक केली आहे. यातील मुख्य मास्टरमाइंड हा झारखंड येथील नसून तो बिहारचा असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. त्यामुळे नांदेडची एक टिम बिहारला रवाना झाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नांदेडला आले होते. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर गावातील लोकसंख्या १५०० आहे आणि या गावातून तब्बल १५हजार ५६९ जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला जन्मनोंदणी प्रमाणपत्र काढण्यात आले असल्याची माहिती उजेडात आणली.
झारखंड राज्यातील एका व्यक्तीने जमीन वादाच्या प्रकरणातून सावळेश्वर येथे येऊन काढलेले जन्म नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर यातील धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे १५ हजार ५६९ बनावट जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब पुढे आली. आणि कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलिस ठाण्यात सुरुवातीला या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे तपास आला. सायबर टिमची मदत व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यातील धागेदोरे हे झारखंडपर्यंत पोहचल्याने पोलिस निरीक्षक आयलाने यांनी पथकाला झारखंड राज्यातील गढवा येथील जितेंद्र कुमारसिंह महेंद्र प्रतापसिंह, ओमप्रकाश उमेश मिश्रा, लक्ष्मी अमितकुमार पंडित, सुमितकुमार निर्मलसिंह आणि सतीशकुमार साहू या पाच जणांना अटक केली. हे पाचही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. झारखंडमधील आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे. यातील मास्टरमाइंड हा बिहारमधील असल्याची बाब पुढे आली आहे.
सीआरएस (सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम) या पोर्टलवर झारखंड येथील आयपी अॅड्रेसवरून सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी व पासवर्ड हॅक केला व मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या सहा महिन्यांत १५ हजार बनावट जन्मनोंदणी प्रमाणपत्र काढण्यात आले. यातून पकडलेल्या आरोपींचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. त्याचबरोबर दलाल व सायबर कॅफे चालकांना सोबत घेऊन हे रॅकेट सुरू आहेत. सध्या देशातील महाराष्ट्र, उत् ारप्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार, पश्चिम बंगाल या सहा राज्यांत या रॅकेटची व्याप्ती असल्याची माहिती पुढे आली आहे.
आतापर्यंत १३ सापडले
बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रकरणात झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील गढवा येथील अटक केलेल्या आरोपींकडे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील साळवेश्वर ग्रामपंचायतीचे जन्म दाखले दिलेले १३ प्रकरण उघडकीस आले आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांचे सीआरएस केंद्र आहे. यातील प्रमाणपत्र हे बिहारच्या व्यक्तीने आपल्याला तयार करून दिल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. दरम्यान, झारखंड येथील आयपी अॅड्रेस १५ हजार ५६९ पैकी किती जण झारखंड राज्याचे व इतर राज्याचे किती याचा शोध घेणे सुरू असून, यातील मास्टरमाइंडला ताब्यात घेतल्यानंतर यातील अधिक तपशील पुढे येईल.