The issue of crop insurance for 25 thousand farmers in Hadgaon-Himayatnagar taluka will be resolved
हदगाव : पुढारी वृत्तसेवा हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील खरीप २०२३ च्या थकीत पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या दोन्ही तालुक्यांतील २५ हजार २९४ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार कोहळीकर यांनी दिली.
हदगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला बसले असताना अधिवेशन सुरू असतानाच ही माहिती मिळताच आमदार कोहळीकर सभागृहातून बाहेर आले. त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन मंत्रालयाच्या लॉबीमध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तसेच उपोषणकर्ते प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्याशी कृषिमंत्र्यांचा थेट संवाद घडवून आणला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द त्यांनी दिला.
(दि.४) जून २०२५ रोजी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात बैठक आयोजित करून पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या बैठकीत आमदार कोहळीकर आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. त्यानंतर (दि.२८) ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील खरीप २०२३-२४ च्या थकीत पीक विम्याबाबत बैठक झाली.
या बैठकीत पीक विमा कंपनीच्या बाजूने भूमिका घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही आमदार कोहळीकर यांनी हा विषय सोडला नाही. कृषी सचिव परिमल सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती करून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याचा पुढील टप्पा म्हणून (दि.२१) सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजयाताई चव्हाण, कृषी सचिव परिमल सिंह, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कलशेट्टी, शेतकरी प्रतिनिधी हणमंत राजे गोरे, निलेश देशमुख, संदीपकुमार देशमुख आणि पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार कोहळीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.