नांदेड, पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावयाचा २ लाख रुपयांच्या दंडाचा धनाकर्ष भाजपाच्या तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रमुख डॉ. मोहन चव्हाण यांनी ठाकरे यांच्याकडे सोमवारी टपाल खात्याच्या जलद डाक सेवेद्वारे पाठवली. या प्रसंगाचा येथे उत्सव केला.
उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी गेलेल्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गुरूंनी दिलेली विभूती आणि प्रसाद ठाकरे यांनी स्वीकारला नाही, असा आरोप करून डॉ. चव्हाण यांनी ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळतानाच खंडपीठाने त्यांना २ लाखांचा दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम ठाकरे यांना प्रत्यक्ष नेऊन द्या, असेही बजावले होते.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर डॉ. राठोड गेल्या महिन्यात ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी रक्कम घेऊन गेले होते. पण त्यांना भेट न मिळाल्याने ते नांदेडला परतले. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी बंजारा समाजातील स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांना येथील मुख्य टपाल कार्यालयासमोर पारंपरिक वेषात एकत्र जमवले. त्यांनी दंडाच्या रकमेचा धनाकर्ष टपाल खात्यामार्फत ठाकरे यांच्या पत्त्यावर रवाना पाठवून दिला. नंतर ठाकरे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.