

रायगड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना रायगड जिल्हाप्रमुख, दिवंगत माजी आ. मधुकर ठाकूर यांचे पुत्र अमिर ऊर्फ पिंट्या ठाकूर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर ठाकूर यांना अलिबाग शहरातील शितोळे आळी येथील त्यांच्या घरी गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोस्टद्वारे चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये पिंट्या ठाकूर मेरा नाम पी. के. टायर्स सुनील कुमार है, महेश टॉकीज मै चेंबूर, मुंबई, छोटा राजन आदमी है. मुझे २५ लाख देना नहीं तो तुझे खत्म करूंगा. पी. के. टायर्स सुनील असे नमूद करण्यात आले आहे. चिठ्ठीचे गांभीर्य लक्षात घेत, पिंट्या ठाकूर यांनी तातडीने अलिबाग पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी अज्ञातावर खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ३०८ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेह भुंडेरे करीत आहेत