The district bank is prohibited from recruiting employees!
विशेष प्रतिनिधी
नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती प्रक्रिया करू नये, असे सहकार खात्याच्या विभागीय सहनिबंधकांनी बँक प्रशासनास बजावले असून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
सहनिबंधक प्रवीण फडणीस यांचे यासंदर्भातील पत्र बँकेच्या मुख्यालयास गेल्या आठवड्यात प्राप्त झाले. तत्पूर्वी फडणीस यांनी १२ जानेवारी रोजी नांदेडला भेट देऊन जिल्हा बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेतील अनियमिततेविरुद्ध तक्रार करणारे संदीपकुमार देशमुख बारडकर यांचे म्हणणे नोंदवून घेतले होते.
जिल्हा बँकेमध्ये सरळसेवेद्वारे १५६ पदे भरण्यास सहकार आयुक्तांनी मागील वर्षी मंजुरी दिली होती; पण शासनाकडून बिंदू नामावली (रोस्टर) मंजूर करून घेण्याआधीच बँकेने नोकरभरती प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात विभागीय सहनिबंधकांनी भरती प्रक्रिया थांबविली होती.
त्यानंतर नांदेडमध्ये मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही बँकेतील संचालकांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये पूर्वी काम केलेल्या ४५ उमेदवारांना पुढील सहा महिन्यांसाठी बँकेत रुजू करून घेण्यास भाग पाडले होते. या प्रक्रियेत आचारसंहिता भंग झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वरील भरतीस ब्रेक लावला होता.
वरील उमेदवारांना तोंडी आदे-शाद्वारे वेगवेगळ्या शाखांमध्ये रुजू करून घेण्यात आले होते. पण नंतर त्यांचे काम थांबविण्यात आले. मनपा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर त्यांना पुन्हा रुजू करून घेतले जाऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी १४ जानेवारीच्या आपल्या पत्रान्वये कोणत्याही प्रकारची भरती करू नये, असे बँक प्रशासनाला कळविले.