नांदेड

Telangana Ganja Smuggler-तेलंगणाचा गांजा तस्कर जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; एक किलो गांजा जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : देगलूर नाका परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मोकळ्या जागेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तेलंगणा राज्यातील एका गांजा तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५२ हजार २०० रुपये किमतीचा १ किलो ४० ग्रॅम अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद आमेर मोहम्मद इस्माईल (वय २३, रा. रकाश पेठ, बोधन, जि. निझामाबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईत गांजा पुरवणारी नांदेडमधील मुख्य महिला संशयित पूजा जोंधळे (रा. शांती नगर, इतवारा, नांदेड) ही फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. २९ जून रोजी स्थागुशाच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देगलूर नाका परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार आहे. या खात्रीशीर माहितीवरून पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळावर सापळा रचून छापा टाकला. तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या मोहम्मद आमेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये पांढऱ्या नायलॉनच्या पिशवीत हिरवट रंगाचा सुकलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा गांजा आणि २०० रुपयांची बॅग असा एकूण ५२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फरार महिलेचा शोध सुरू

पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याने नांदेडमधील पूजा जोंधळे हिच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. अटक केलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी इतवारा पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT