'Swarati' Marathwada University The posts of Registrar, Librarian and all four Deans are vacant
विशेष प्रतिनिधी
नांदेड : पुढील आठवड्यात आपल्या स्थापनेची ३१ वर्षे पूर्ण करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची तयारी सुरू झालेली असतानाच या विद्यापीठामध्ये मागील काही वर्षांपासून कुलसचिवांसह महत्त्वाच्या पदांवर 'प्रभारीराज' असल्याचे समोर आले आहे.
१९९४ साली एका ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या विद्यापीठाचा वर्धापन दिन येत्या १७सप्टेंबर रोजी आहे. पण विद्यापीठ प्रशासनाने यानिमित्ताने ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांची आखणी केली असून या दरम्यान दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि उच्चशिक्षण राज्यमंत्री नीलय नाईक यांना आमंत्रित केले आहे. १७ सप्टेंबर रोजी चार जिल्ह्यांतील आमदार-खासदारांना आमंत्रित करून सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यमान कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना नुकतीच दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर डॉ. अशोक महाजन यांनी प्र-कुलगुरूपदी निवड करण्यात आली. पण या दोघांनंतर विद्यापीठ प्रशासनात महत्त्वाचे असलेले कुलसचिवपद रिक्त असून प्रा. ज्ञानेश्वर पवार हे या पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. परीक्षा विभागप्रमुख वित्त आणि लेखाधिकारी, चार पूर्णवेळ अधिष्ठाता, ग्रंथपाल इत्यादी महत्त्वाच्या पदांवर प्रभारीराज असल्याचे गुरुवारी विद्यापीठामध्ये झालेल्या वार्ताहर बैठकीनंतर स्पष्ट झाले.
या बाबत चौकशी केली असता, असे सांगण्यात आले की, विद्यापीठातील वेगवेगळ्या रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने आधी मान्यता दिली होती. त्यानुसार विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांकडून अर्जही मागविले. पण नंतर शासनाने भरती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली.
विद्यापीठाचे ग्रंथालय अत्यंत सुसज्ज असले, तरी माजी ग्रंथपाल डॉ.एस. पी. सातारकर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर गेल्या १३ वर्षांपासून पूर्णवेळ ग्रंथपालाची नियुक्तीच झालेली नसल्याचे दिसून आले.
येत्या १३ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या पुढाकारातून विद्यापीठ परिसरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ५ हजार ३०० इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होत आहेत. नांदेडसह राज्यातील कोणत्या महानगरांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे, हे या मेळाव्यादरम्यान उमेदवारांना सांगितले जाईल. रोजगार मेळाव्याचा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे. वर्धापन दिन सप्ताहाचा समारोप १९ सप्टेंबरला होईल, असे सांगण्यात आले.