विद्यार्थ्यांनी घेतला माळेगावात पारंपरिक यात्रेचा अनुभव File Photo
नांदेड

विद्यार्थ्यांनी घेतला माळेगावात पारंपरिक यात्रेचा अनुभव

नांदेडसह लोहा, कंधार, अर्धापूर तालुक्यांतील ३३ शाळांचा सहलीत सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Students experienced the traditional fair in Malegaon

लोहा, पुढारी वृत्तसेवा शालेय विद्यार्थ्यांना माळेगावच्या पारंपारिक यात्रेचे दर्शन घडावे तसेच यात्रेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत लोहा, कंधार, अर्धापूर, नदिडसह इतर तालुक्यांतील एकूण ३३ शाळांच्या सहली माळेगाव यात्रेत सहभागी झाल्या. या सहलींमधून जवळपास साडेपाचशे विद्यार्थ्यांनी माळेगाव यात्रेची पाहणी करून तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

माळेगाव यात्रेच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर व शिक्षणाधिकारी नियोजन दिलीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीत अध्यक्ष म्हणून विस्तार अधिकारी डी. आर. शिंदे, तसेच केंद्रप्रमुख एम. बी. सोनकांबळे, डी. व्ही. मोहिते, केंद्रीय मुख्याध्यापक व्ही. जी. गायकवाड, जी. एन. धुळगंडे, जी. एस. उप्परवाड यांचा समावेश होता. याशिवाय या समितीत एकूण १८ सहशिक्षक सहभागी होते.

समितीतील सर्व सदस्यांनी यात्रेत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत करून शालेय शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रम तसेच शैक्षणिक स्टॉल्सची माहिती दिली. विद्यार्थ्यांना माळेगाव यात्रेची सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष यात्रास्-थळी फिरवून मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्टपणे दिसून आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही माळेगाव यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पालकांसोबत आलेल्या सुमारे दीड ते दोन लाख मुला-मुलींनी देखील माळेगावची यात्रा अनुभवली तसेच येथील शैक्षणिक प्रदर्शनाला भेट दिली.

विद्यार्थ्यांना यात्रा म्हणजे काय, यात्रेतील परंपरा, थाटण्यात आलेली विविध दुकाने, श्री खंडोबाचे दर्शन, तसेच यात्रेचे सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरला असून त्यातून विद्यार्थ्यांना परंपरा, संस्कृती व सामाजिक जीवनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याचे मत शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT