Students blocked the ST bus due to inconvenience
कंधार, पुढारी वृत्तसेवा कंधार तालुक्यातील सावरगाव येथून दररोज सुमारे १०० ते १२० विद्यार्थी अंबुलगा येथील माणिक प्रभू विद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत बससेवा अपुरी पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त विद्यार्थ्यांनी आज चक्क महामंडळाची एस.टी. बस अडवून धरली.
सावरगाव येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी अंबुलगा येथील माणिक प्रभू विद्यालयात शिक्षणासाठी जातात. दररोजच्या प्रवासासाठी उपलब्ध असलेली बस विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी अपुरी पडत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही, तर काहींना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज एमएच १४ बीटी २४३० क्रमांकाची एस.टी. बस अडवली. "जोपर्यंत दुसरी बस उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत बस जाऊ देणार नाही," अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
विद्यार्थ्यांनी जवळपास ४० मिनिटे एस.टी. बस रोखून धरली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांनी दुसरी बस उपलब्ध करून दिली. दूसरी बस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मागे घेतली आणि एस.टी. बस मार्गस्थ झाली. दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या १०० ते १२० विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी प्रवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी सावरगाव-अंबुलगा मार्गावर अधिक बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा विचार करून एस.टी. महामंडळाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.