Nanded News : एसटी महामंडळाच्या बसेस शहरातून सुसाट ! file photo
नांदेड

Nanded News : एसटी महामंडळाच्या बसेस शहरातून सुसाट !

नांदेडकरांचा जीव मुठीत; शॉर्टकटच्या नादात शहरातील अंतर्गत रस्त्यांवरूनही होतेय वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

ST Corporation buses speeding through the city!

गोविंद सरदेशपांडे

नांदेड: शहरातील अंतर्गत राज्य रस्त्यांवरून परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस नेण्यास सक्त मनाई असतानाही एसटी चालकांकडून या आदेशाची सर्रास पायमल्ली केली जात आहे. मुख्य आणि गजबजलेल्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या या लालपरीमुळे शहरातील नागरिक, पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे.

नांदेड शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एसटी बसेसना बाह्य वळण रस्त्याचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून बसेस आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, वेळ आणि इंधन वाचवण्याच्या नादात अनेक एसटी चालक सरळ शहरातूनच बसेस आणत असल्याचे चित्र ही नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह, शाळा- महाविद्यालयांचे परिसर आणि दाट लोकवस्तीच्या भागांतून या मोठ्या बसेस अत्यंत निष्काळजीपणे आणि सुसाट वेगाने नेल्या जात आहेत.

दरम्यान, लातूरहून येणाऱ्या अनेक एसटी बसेस या लातूर फाटा नवीन कौठा, जुना कौठा या मार्गाने शहरातील वजिराबाद भागातून शिवाजी पुतळामार्गान बसस्थानकात जाताना दिसून येत आहे. तर काही बसेस या नवीन कौठा, जुना कौठा परिसरातील रविनगर भागातील मुख्य मार्गाने वजिराबाद येथे येत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही बसेस या लातूर फाटा मार्गाने जुनामोंढा भागातील रस्त्याने वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहेत.

शहरातील रस्ते आधीच अरुंद असून त्यावर स्थानिक वाहनांची मोठी वर्दळ असते. अशातच अचानक समोरून येणाऱ्या वेगात असलेल्या एसटी बसमुळे दुचाकीस्वार ऑटोचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. अनेकदा चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात घडले आहेत. रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना मागून किंवा समोरून वेगाने येणाऱ्या एसटी बसमुळे नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे-

कठोर कारवाईची मागणी....

प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन शहरातून धावणाऱ्या एसटी बसेसवर बंदी घालणारा आदेश काटेकोरपणे अमलात आणावा. जे चालक शहरात बस आणून वेगाने चालवतील, त्यांच्यावर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नांदेड शहरातील त्रस्त नागरिक करत आहेत. अन्यथा, या बेजबाबदार वाहतुकीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

नागरिकांचा आक्रोश....

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. शहरातील अंतर्गत मार्गावरून एसटीची वाहतूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

एसटी महामंडळाच्या बसेसला जुना मोंढा किंवा जुना कौठामार्गे शहरात येऊ नये, असे आदेश दिलेले असताना देखील, काही बसेस शहरात येत आहेत. आतापर्यंत काही बसेसवर कारवाई केलेली आहे. तसेच आगार प्रमुखांना या संदर्भात पत्रही दिले आहे. महामंडळाच्या एसटी बसेस शहरात येत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होत आहे. यापुढे अशा बसेस शहरातून आल्यास कडक कारवाई केली जाईल.
- मारोती मुंडे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नांदेड
या संदर्भात संबंधितांना पत्राद्वारे सूचना दिली जाईल. तसेच सूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्याविरुध्द कारवाई केली जाईल.
- अभय देशमुख, विभाग नियंत्रक, नांदेड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT