चिंचखेड येथून रामपूरच्या दिशेने स्कुटीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले Pudhari
नांदेड

Nanded Liquor Seized | स्कुटीवरून देशी दारूची वाहतूक; दोघे ताब्यात, सिंदखेड पोलिसांची कारवाई

१ हजार बाटल्या आणि स्कुटीसह १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Sindkhed Police Action Scooter Liquor Transport

सारखणी : नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सिंदखेड पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. चिंचखेड येथून रामपूरच्या दिशेने स्कुटीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी दारूच्या १,००० बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कुटी असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ९ सप्टेंबर २०२६ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या पथकाला चिंचखेडहून रामपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर स्कुटीवरून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामपूर पैनगंगा नदीजवळील पुलाजवळ सापळा रचला.

यावेळी एमएच-२९-बीटी-३१३१ क्रमांकाची स्कुटी संशयावरून थांबवून पोलिसांनी तपासणी केली. स्कुटीच्या दोन्ही बाजूंना ठेवलेल्या पिशव्यांमध्ये देशी दारूच्या तब्बल १,००० बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४० हजार रुपये, तर स्कुटीची अंदाजे किंमत ६२ हजार रुपये आहे. त्यामुळे पोलिसांनी एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी करण प्रल्हाद बोटरे (वय २२) आणि दुर्गेश विजय दुतकर (वय २१, दोघेही रा. नवीन कापेश्वर, ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांच्याविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलीस अंमलदार पोना कोंडापलकुलवार, पोको इंगळे आणि चालक होमगार्ड राठोड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT