Nanded Political News : नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी, शिंदे सेनेचा कल भाजपाकडे File Photo
नांदेड

Nanded Political News : नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी, शिंदे सेनेचा कल भाजपाकडे

लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

Signs of a friendly contest between BJP and NCP in Loha Municipality elections

लोहाः लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून नगराध्यक्ष पद हे जनतेतून सर्वसाधारणसाठी असल्याने या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली असून आपापल्या गॉड फादरकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी पाहता या ठिकाणी भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत दिसून येत आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गट भाजपासोबत युती व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोहा नगरपालिकेवर मागचे पाच वर्ष भाजपाचे वर्चस्व होते. नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे गजानन सूर्यवंशी विराजमान होते. त्यांचा कार्यकाळ संपून जवळपास अडीच वर्षाचा कालावधी गेला. त्यानंतर आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय पार्श्वभूमी पाहता, या ठिकाणी शिवसेना (एकनाथ शिंदे)-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये युती होण्याची कमी शक्यता दिसत असून, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मैत्रीपूर्व निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत राजकीय वातावरणावरून दिसत आहे. मात्र, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी खुले असल्याने नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी दंड थोपटून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. यामध्ये मावळते नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, भाजपाचे मंडळाध्यक्ष शरद पवार हे भाजपाकडून इच्छुक आहेत तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ माजी नगरसेवक केशवराव मुकदम, दत्ता वाले, जिजाबाई पवार, करीम शेख हे निवडणूक लढवण्याचे संकेत आहे. काँग्रेस पक्षाकडून व्यंकटेश उर्फ सोनू संगेवार हे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष आशाताई चव्हाण यांच्याही नावाची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

लोहा नगरपालिकेवर मागच्या पाच वर्षांपूर्वी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून गजानन सूर्यवंशी व १३ नगरसेवक भाजपाकडून निवडून आले होते. पुढे काही दिवस नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व आमदार चिखलीकर यांचा राजकीय संसार चांगला चालला. पण काही वर्षानंतर दोघांमध्ये राजकीय मतभेद निर्माण झाल्याने गजानन सूर्यवंशी यांनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची साथ सोडून त्यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे श्री. सूर्यवंशी व आ. चिखलीकर यांच्यात मतभेद वाढले आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती या ठिकाणी होण्याची कमी शक्यता असून ते नगरपालिकेत मैत्रीपूर्ण लढत लढण्याच्या दिशेने दोघेही तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना (शिंदे गट) मधील काही कार्यकर्ते आ. प्रताप पाटील चिखलीकर सोक्त जाण्याच्या तयारीत आहेत तर काही कार्यकर्ते भाजपासोबत निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे.

लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत खा. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व मंडळाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्यापैकी एकाला उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी मिळण्याचे जवळपास पक्के आहे. त्यांचा थेट मुकाबला आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारांशी होणार असल्याचे बोलले जात आहे.

आ. चिखलीकर यांच्याकडून ज्येष्ठ नगरसेवक केशवराव मुकदम, जिजाबाई पवार, दत्ता वाले किंवा चिखलीकरांच्या ठेवणीतील एखादा ऐनवेळी उमेदवार जाहीर होऊ शकतो, त्यामुळे लोहा निवडणुकीत खा. अशोक चव्हाण विरुद्ध आ. प्रताप चिखलीकर अशीच थेट लढत होण्याचे चिन्ह आतापासूनच दिसून येत आहे.

१० प्रभागात २० नगरसेवक

नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, हा अंदाज लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली आहे. या ठिकाणी जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असून त्यासोबतच दहा प्रभागात २० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. लोह्यात एकूण मतदारांची संख्या २३ हजार ६५० इतकी आहे. त्यात पुरुष ११ हजार ५१४, महिला १२ हजार १३३ तर इतर तीन मतदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT