Nanded News : नांदेडमध्ये शिवसेना-उबाठा वाद पेटला file photo
नांदेड

Nanded News : नांदेडमध्ये शिवसेना-उबाठा वाद पेटला

उद्धव ठाकरेंकडून कौतुक, तर खा. आष्टीकरांचे थेट आव्हान

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena-Ubatha dispute flares up in Nanded

नांदेड पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील अंजनखेड येथे बुधवारी शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याच्या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या आंदोलनाची दखल घेत एकीकडे उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांची पाठ थोपटली, तर दुसरीकडे उबाठा सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी "जास्त खुमखुमी असेल तर मला काळे झेंडे दाखवा," असा थेट इशारा दिल्याने दोन्ही बाजूंचा संघर्ष आता उफाळून आला आहे.

उद्धव ठाकरेंकडून कौतुक

सारखणी येथील महाआरोग्य शिबिरादरम्यान उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर केलेले खा. आष्टीकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी ग्रामीण जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट ज्योतिबा खराटे यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) संपर्क साधला.

"तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही," अशा शब्दांत ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांना बळ दिले. तसेच, लवकरच आपण किनवट दौऱ्यावर येत असल्याचेही सांगितले. पक्षप्रमुखांच्या या फोनमुळे उबाठा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

...तर समोर या : खा. आष्टीकर

उद्धव ठाकरेंकडून कार्यकर्त्यांचे कौतुक होत असतानाच, खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. उबाठा सोडून शिंदे गटात सामील झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असलेल्या खा. आष्टीकर यांनी माध्यमांशी बोलताना उबाठा कार्यकर्त्यांना उघडे आव्हान दिले. "मी गेल्या पाच-सहा दिवसांपासून मतदार संघातच फिरत आहे. मला काळे झेंडे दाखवा. जास्त खुमखुमी असेल तर माझ्या समोर येऊन दाखवा," अशा कडक शब्दांत त्यांनी गर्भित इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT