काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन file photo
नांदेड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन

नांदेड जिल्हा परिषदेचे ११ वर्षे सांभाळले होते अध्यक्षपद

पुढारी वृत्तसेवा

Senior Congress leader Shriram Patil Rajurkar passes away

देगलूर, पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या नेतृत्व गुणांवर पोलीस पाटील ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणारे आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सलग ११ वर्षे आपल्या कामाची चुणूक दाखवणारे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर (८६) यांचे बुधवारी (दि.१ जुलै) नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक 'हिरा' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (दि. २ जुलै) दुपारी १:०० वाजता राजुरा बु. (ता. मुखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

पोलीस पाटील ते 'झेडपी' अध्यक्ष : असा राहिला राजुरकरांचा प्रवास मुखेड तालुक्यातील राजुरा बु. येथील मातीत जन्मलेल्या श्रीराम पाटील यांनी संघटन कौशल्याच्या जोरावर राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी पोलीस पाटील, सरपंच, पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा यशस्वी राजकीय प्रवास केला.

माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. शंकरराव चव्हाणांच्या संमतीने त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सलग ११ वर्षे भूषवले. या प्रदीर्घ काळात त्यांनी शिक्षण, जलसिंचन, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात मोठा वाटा उचलला.

सलग १० वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

जिल्हा परिषदेसोबतच श्रीराम पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. सलग १० वर्षे त्यांनी हे पद सक्षमपणे सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात व नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक नवे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य घडले. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT