Nanded News : शाळेची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली  File Photo
नांदेड

Nanded News : शाळेची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रशासन अद्यापही गाफीलच

पुढारी वृत्तसेवा

School wall collapses, fortunately no casualties

बाहऱ्हाळी, पुढारी वृत्तसेवा : मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जुनी आणि जीर्ण इमारत, गळके छत, ओलसर भिंती आणि पावसाळ्यात पाण्याचे साम्राज्य असते. अशा परिस्थितीत मुलांना शिकावं लागत आहे. यातच नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेची एक भिंत को-सळली. यामध्ये सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण हा केवळ एक इशारा आहे.

संबंधित विभाग मात्र विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळत आहे? शाळेची भिंत तीन महिन्यापासून थोडी थोडी पडत होती आणि काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात सगळी भिंत कोसळली. पण गट शिक्षणाधिकारी यांना मात्र भेट देण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. शाळेच्या दुरवस्थेमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळेतून काढून घेणे पसंत केले.

प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी

हीच परिस्थिती एखाद्या खासगी शाळेत असती, तर ती कधीच सील झाली असती. मग सरकारी शाळेच्या बाबतीत हे दुर्लक्ष का? असा सवाल संतप्त पालक करत असून, प्रशासनाने तत्काळ शाळेला भेट देऊन, नव्याने इमारत बांधावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

प्रशासन किती दिवस झोपेचं सोंग घेणार?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि शिक्षणाच्या हक्काशी हा सरळसरळ खेळ आहे. एका भिंतीचा कोसळलेला तुकडा ही केवळ सुरुवात आहे. उद्या काही मोठं घडलं, तर जबाबदार कोण? प्रशासन जागं होणार की आणखी एखादी दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार?, असाही प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT