School Nutrition: Many schools do not cook khichdi due to non-availability of food grains
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन २० दिवस उलटले असले तरीही संबंधित यंत्रणेकडून आवश्यक तो धान्यसाठा उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा बोजवारा उडाल्याचे मानले जाते. धान्य पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत असून येत्या दोन दिवसांत धान्य पुरवठा होईल, असे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात २१८७ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. तर १५०४ खासगी शाळा आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. या योजनेंतर्गत पूर्वी फक्त खिचडीचे वाटप होत होते. पण कालांतराने त्यात वेळोवेळी बदल झाले. मध्यंतरी अंडी व केळी देण्याचा प्रयोग झाला. परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. आता पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सुधारित पाककृती तयार करण्यात आली आहे.
सोमवार (व्हिजिटेबल पुलाव), मंगळवार (मूग, शेवग्याचे वरण, भात), बुधवार (मटार पुलाव) गुरुवार (चवळीची खिचडी), शुक्रवार (मसुरी पुलाव), शनिवारी (सोयाबीन पुलाव) देण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात हा मेनू दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ व भात, मूगदाळ खिचडी, चना पुलाव, मूग शेवग्याचे वरण भात व सोयाबीन पुलाव देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पहिल्या आठवड्यातील पाककृतीसाठी इयत्ता पहिली ते ५ वी व ६ वी ते ८ चे दर वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने या संदर्भात निर्देश दिल्यानंतर शिक्षण विभागाने बुधवारी एक परिपत्रक जारी करून सर्व शाळांना याबाबत सूचना दिल्या. या सूचना देताना शाळांमध्ये किती धान्य उपलब्ध आहे. याची माहिती घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन २० दिवस उलटले तरीही अनेक शाळांमध्ये धान्यच उपलब्ध नसल्याने या योजनेबाबत आनंदीआनंद आहे. बुधवारी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन सर्व शाळांना तत्पर धान्य कसे मिळेल याबाबत विचारविनिमय केला. येत्या दोन दिवसांत ते धान्य पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांकडून उपलब्ध धान्यासाठी किती आहे. याची माहिती एकत्र केली जात आहे.
धान्याचा पुरवठा राज्य शासनाकडून होणार असून भाजीपाला, इंधन शाळांनी स्वतः खरेदी करून त्याचे देयके सादर करावयाची आहेत. ज्या शाळांमध्ये स्वयंवाकी किंवा मदतनीस यांची नेमणूक नाही, अशा शाळांची माहितीही संकलित केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.येत्या दोन दिवसांत धान्याचा पुरवठा केला जाईल, तसे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांमधील मोठी विद्यार्थी संख्या आहे. अशा शाळांनाही शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. ज्या शाळांमधील धान्य पुरवठा संपला आहे. येथे प्राधान्याने धान्याचे वाटप होईल. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न मिटेल,
येत्या दोन दिवसांत धान्याचा पुरवठा केला जाईल, तसे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांमधील मोठी विद्यार्थी संख्या आहे. अशा शाळांनाही शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. ज्या शाळांमधील धान्य पुरवठा संपला आहे. येथे प्राधान्याने धान्याचे वाटप होईल. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न मिटेल,- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी, नांदेड