

District Collector's bungalow renamed 'Sneh Niwas'
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दप्तरी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या बंगल्याच्या नावाची 'स्नेह निवास' अशी नोंद असून त्यानुसार या बंगल्याचे नूतनीकरण करताना त्यास पूर्वीचेच नाव प्राप्त झाले आहे. मागील जिल्हाधिकाऱ्यांनी या बंगल्याचे 'अमृतगाथा' असे नामांतर केले होते, ती गाथा आता हद्दपार झाली आहे.
नांदेड शहराच्या मध्यवर्ती भागात शासकीय विश्रामगृहांच्या समोरील शासकीय अधिकाऱ्यांची वसाहत स्नेह नगर या नावाने ओळखली जाते. या वसाहतीतील बंगले आणि इमारतींना विविध नक्षत्रे, झाडं, फुलं यांची नावे देण्यात आली; पण मुख्य रस्त्यावरच असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशस्त आवारातील बंगल्याचे 'स्नेह निवास' असे नामकरण करण्यात आले होते. बांधकाम खात्याकडेही तशीच नोंद आहे.
विद्यमान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यंदा फेब्रुवारी महिन्यात येथे रुजू झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली, तरी काही महिने बंगला त्यांच्याच ताब्यात होता. आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी या बंगल्याचे नूतनीकरण करून घेताना पूर्वीचे 'स्नेह निवास' हे नाव बदलून बंगल्याच्या बाहेर 'अमृतगाथा' असे नाव टाकले. स्थानिक पातळीवर त्याची कोणीही नोंद घेतली नाही; पण राऊत यांची बदली झाल्यानंतर या बंगल्याचे नामांतर परस्परच झाल्याचे बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले होते.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा या निवासस्थानात प्रवेश होण्यापूर्वी बांधकाम खात्याकडून मधल्या काळात आवश्यक ती कामे करण्यात आली. बंगल्यामधील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर दर्शनी भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाची नव्याने नोंद करतानाच उजव्या बाजूला 'स्नेह निवास' हे पूर्वीचेच नाव आता टाकण्यात आले आहे. कर्डिले यांच्याशी संपर्क साधला असता मागील काळात या बंगल्याचे नामांतर झाले, ही बाब त्यांना ठाऊकच नसल्याचे स्पष्ट झाले. पण 'स्नेह निवास' हे नाव चांगलेच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.