नांदेड ः मे महिना अंतिम टप्यात असून प्रचंड उष्णतेने लाहीलाही झालेल्या सर्वांनाच पावसाचे वेध लागले आहेत. तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचले असताना जलाशयातील उपलब्ध साठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे; परंतु नांदेडमधील विष्णुपुरी व मानार (बारुळ) या दोन्ही मोठ्या प्रकल्पांत समाधानकारक साठा आहे. नऊपैकी सहा मध्यम प्रकल्प अर्धेअधिक भरले आहेत. यंदा मान्सून वेळेत येत असल्याने टंचाईची शक्यता दिसत नाही.
दरवर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व किवा वळीवाचा पाऊस जोरदार बरसतो. गतवर्षी 22 मे रोजी 21.1 मि.मी. तर संपूर्ण मे महिन्यात 153.3 मि.मी. पाऊस पडला होता. वेगवेगळ्या तालुक्यात 7 ते 12 दिवस पावसाचे होते. दि.28 मे 2025 रोजी मुखेड, उमरी, हदगाव, किनवट या भागात अतिवृष्टी झाली होती. मुदखेड व हिमायतनगर तालुक्यात 200 मि.मी.चा टप्पा गाठला होता दोन- चार तालुके वगळता अन्यत्र 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पेरणीही लवकर सुरु झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीके जोमदार होती; पण नंतर घात झाला.
जिल्ह्यात 80 लघुप्रकल्प असून 26 ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची स्थिती मात्र खस्ता आहे. गतवर्षी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे भुजल स्तरात किंचित का होईना वाढ झाली. त्यामुळे काही भाग वगळता अन्यत्र बोरला सुद्धा पाणी आहे. शहर व लगतच्या वसाहतीमध्ये महानगर पालिकेतर्फे नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो आहे; परंतु महावितरणच्या गचाळ कारभाराने नांदेडकरांना वेठीस धरले आहे. आता मे महिना संपत आला असून वातावरणात सतत बदल होतो आहे.
एकीकडे तापमान असह्य होत असताना पॅसिफीक महासागरात विकसित होत असलेल्या अल निनोच्या प्रगतीत अडथळा येतो आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान देशाच्या जवळपास 50 टक्के पावसाची जीवनरेखा असलेल्या वार्षिक नैऋत्य मान्सूनसाठी भारत सज्ज होन असताना हवामान तज्ज्ञांनी एल निनोबद्दल इशारा दिला आहे, जो शेतकरी, जलाशय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या क्षमतेची कसोटी घेऊ शकतो.
दरम्यान, गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक 1231 मि.मी. अर्थात 138 टक्के पाऊस झाला होता. परिणामी यंदा पाणीटंचाई लक्षणीय भासली नाही. फक्त 4 गावे व 11 वाडी-तांड्यात 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. एकूण 178 विहिरी अधिग्रहीत पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात 19 मे रोजी 53.61 टक्के उपयुक्त जलसाठा आहे तर मानार अर्थात बारूळ धरणात 44.27 टक्के जलसाठा आहे. नऊ मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पांत 50 टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांपैकी सहा ठिकाणी अर्धाअधिक साठा आहे.