नांदेड : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री वाळू तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवून गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई केली. मार्कंड शिवारात झालेल्या या कारवाईत 65 ब्रास वाळू, 5 हायवा, जेसीबी आणि 67 तराफे असा एकूण 2 कोटी 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. काही काळ सुस्त असलेल्या या पथकांनी पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये येत गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तस्करांचे जाळे उद्ध्वस्त केले.
पथक प्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम माचेवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्या कारवाईत माळाकोळी-खेडकरवाडी रस्त्यावर 20 लाख रुपये किमतीचा हायवा आणि 5 ब्रास वाळू जप्त केली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वात मोठी कारवाई मार्कंड शिवारात करण्यात आली. या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला. या कारवाईत 1 कोटी 82 लाख 30 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये 4 हायवा, 1 जेसीबी मशीन, वाळू उपसण्याचे इंजिन, 67 तराफे आणि 60 ब्रास वाळूचा समावेश आहे.
पथकाला 10 हजारांचे बक्षीस
वाळू माफियांचे धाबे दणाणणाऱ्या या धाडसी कामगिरीबद्दल विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक केले आहे. या पथकाला 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. या कारवाईत संदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा सहभाग होता.