मारोती वाडेकर
Madhavrao Patil Jawalgaonkar Congress to BJP Nanded
हिमायतनगर : हदगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील- जवळगावकर यांच्या भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यात जोर धरू लागली होती. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड येथे शंखनाद सभा झाल्यानंतर जवळगावकरांच्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपत जाण्याची चर्चा निराधार ठरली आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची जनतेबरोबर गेल्या पंचवीस वर्षांपासून मजबूत पकड आहे. विकास कामासह जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. त्यामुळे जवळगावकर यांचा जनाधार मोठा आहे. ते माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू होते. जवळगावकर यांच्या कन्येचा शुभविवाह सोहळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विवाह सोहळ्यास देखील भाजपचे आजी माजी आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहिले होते.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शंखनाद सभेचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले होते. या सभेत त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा सर्वत्र झाली होती. कारण, त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू होत्या. परंतु, जवळगावकर यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे निष्ठापूर्वक काम केले होते.
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नांदेड येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित राहून काँग्रेस पक्षासोबत ठाम असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा फोल ठरली आहे. दरम्यान, नांदेड येथे जवळगावकर यांच्या निवासस्थानी खासदार रवींद्र चव्हाण, खासदार कल्याणराव काळे, माजी खा.तुकाराम रेंगे, माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भेट देऊन जवळगावकर यांच्याशी चर्चा केली.