

मुखेड, पुढारी वृत्तसेवा : मुखेड तालुक्यातील चांडोळा - बोरगाव रोडवर दुचाकी - ट्रॅक्टरची धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर २ तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना आज ( दि.९) सकाळी ९ च्या सुमारास घडली. हे विद्यार्थी कॉम्प्युटर क्लासला जात होते. (Nanded Accident)
याबाबत अधिक माहिती अशी की, धनज गावातील मनीष राम वल्लेमवाड (वय 18), मारोती राजेश गायकवाड (वय 17) व विवेक संतोष मानेकर (वय 20) हे तिघे मित्र दुचाकीवरून (एमएच 26 एक्स 2586) धनज गावातून मुखेडकडे जात होते. यावेळी चांडोळा तलावातील काळी माती घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एम एच 26 बी. एक्स 3278) अचानक चांडोळा - बोरगांव रोडवर आला. यावेळी दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली. यात मनीष वल्लेमवाड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर विवेक मानेकर यास डोक्यास गंभीर दुखापत झाली असून मारोती गायकवाड याच्या हाताला गंभीर मार लागला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चांडोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोघांवर उपचार करुन नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मृत मनीष वल्लेमवाड एकुलता होता. त्याला एक बहिण आहे. त्याचे आई वडील अल्पभूधारक असून मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षण घेऊन घरातील परिस्थिती बदलण्याची मनिषची इच्छा होती. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णायलात शवविच्छेन करुन धनज येथे दुपारी ४ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.