Retired employee beaten with iron rod case registered
शिऊर, पुढारी वृत्तसेवा :
वाकला (ता. वैजापूर) येथे उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या मुलीवर तीन जणांनी एकत्रितपणे शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.३) रात्री घडली आहे.
याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दगू त्रिभुवन, सचिन दगू त्रिभुवन व सत्वशिल दगू त्रिभुवन (सर्व रा. वाकला, ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी बाळकृष्णा महादेव शिनगारे (६२, रा. निमोणी बाग, दत्तनगर, भिवंडी, सध्या मूळगाव वाकला, ता. वैजापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जुलै रोजी रात्री २ ते २.३० वाजेदरम्यान त्यांच्या वाकला येथील राहत्या घरी आरोपी दगू त्रिभुवन, सचिन दगू त्रिभुवन व सत्वशिल दगू त्रिभुवन या तिघांनी उधारीच्या पैशावरून वाद घालत उधारी पेक्षा जास्त रक्कम मागितली.
त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी हे घरात घुसले आणि फिर्यादी व त्यांच्या मुलीस शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
आरोपी क्रमांक २ आणि ३ यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात व पायांवर गंभीर मारहाण केली, ज्यामध्ये ते जखमी झाले. या घटनेनंतर बाळकृष्णा शिनगारे यांनी शिऊर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास तक्रार दिल्याने वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.