Nanded Rain : सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अद्याप छदामही नाही Pudhari Photo
नांदेड

Nanded Rain : सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अद्याप छदामही नाही

खरडून गेलेल्या जमिनीची भरपाई सुद्धा शिल्लक; अन्य नुकसानीचे मदत वाटप कासवगतीने

पुढारी वृत्तसेवा

Relief has not yet been received for the damage caused by heavy rain in Nanded.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. ऑगस्टमध्ये फक्त शेतपीक व जमिनीचे मिळून ५७४ कोटी २९ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. पैकी ५५३ कोटी ४९ लक्ष रुपये शासनाकडून प्राप्त झाले. तर सप्टेंबरमध्ये ५१ कोटी १८ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. यापैकी छदामही अद्याप मिळालेला नाही. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात ३३ व्यक्ती मृत झाल्या पैकी २७ पुरात वाहून गेला. ११२२ जनावरे दगावली, १९ हजार ६५८ कुटुंबांचे नुकसान झाले तर २७५८ घरांची पडझड झाली.

मागील दोन दशकात यावर्षी विक्रमी आणि विध्वसंक पाऊस झाला. मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली. २७ व्यक्ती पुरात वाहून गेल्या. वीज पडून तिघे दगावले तर अन्य कारणांमुळे तिघांचा मृत्यू झाला. पैकी ३० प्रकरणांत मिळून १ कोटी २० लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. ११२२ जनावरे दगावली. पैकी ३७३ जनावरांचा पत्ताच लागला नाही. ५५८ प्रकरणात दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. ११७ प्रकरणे प्रलंबित असून इअर टॅग नसल्याने ७४ प्रकरणे अपात्र ठरली.

पुराचे पाणी शिरल्यामुळे किंवा धोका असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे लागल्यामुळे तसेच सामानाचे नुकसान झालेल्या कुटुंबांची संख्या १९ हजार ६५८ असून पैकी केवळ ७हजार ३२१ कुटुंबांना ७ कोटी ३२ लाख रुपये वितरित करण्यात आले. १२ हजार ३३७ कुटुंब अद्याप मदतीपासून वंचित आहेत. घरांची पडझड सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली असून २७५८ कुटुंब बाधित झाली आहेत. ६९७ कुटुंबाना २८ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले आहेत; अद्याप २ हजार ६१ कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. पिके जवळपास बुडाली. काही ठिकाणी उंचावरील पिके तगली. परंतु उत्पादन नगण्य झाले, अर्थात ऑगस्टच्या मध्यापर्यंत खूप चांगला असलेला खरीप हंगाम १५ दिवसात बुडाला. सप्टेंबर अखेरपर्यंत तो नामशेष झाला. जिल्ह्यातील सर्व १५३८ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. ८ लक्ष २९ हजार ९७२ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला. ६ लक्ष ९९ हजार ४५६ हेक्टरवरील कोरडवाहू तर २ हजार ९७१ हेक्टरवरील बागायती पिके नष्ट झाली.

जेमतेम ६९१ हेक्टरवरील फळबागा सुद्धा उदध्वस्त झाल्या. वास्तविक पाहता पिकांच्या नुकसानीची मोजदाद कठीण आहे, परंतु प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी ६०१ कोटी रुपयांची मागणी नोंदवली होती. याशिवाय ३२ हजार १२९ शेतक-यांनी ८ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन खरडून गेली. तर १ हजार ३१० हेक्टर क्षेत्रावर अनावश्यक माती, दगडधोंडे व अन्य कचरा वाहून आला. यांच्या नुकसान भरपाई पोटी ४३ कोटी ४७ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली. यापैकी छदामही अद्याप मिळाले नाही, परंतु पिकांच्या नुकसानीचे ५५३ कोटी ४९ लक्ष रुपये मिळाले असून त्याचे वितरण सुरु झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी नोंदविलेले २८ कोटी ५२ लक्ष रुपये मात्र अद्याप आलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT