संजीव कुळकर्णी
नांदेड ः लातूर येथील ‘आर.सी.सी.’चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या शैक्षणिक साम्राज्यास टाळे लागले आहे. आता त्याची एकंदर पार्श्वभूमी समोर येत असून 10 वर्षांपूर्वी मोटेगावकरांचे नांदेडमध्ये वाजतगाजत आगमन झाल्यानंतर इतर काही खाजगी शिकवणी संस्थांचे ‘अर्थ-रसायन’ हळूहळू लयास गेले.
मोटेगावकर यांचे विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण लातूरमध्ये झाल्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी नांदेडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते स्थानिक यशवंत महाविद्यालयाचे तेव्हाचे गुणवंत; पण शिकवणी संस्थांमधील जबरदस्त स्पर्धेत आपले नाव आणि स्थान अव्वल राखण्यासाठी त्यांनी केलेले उद्योग आणि उधळलेले गुण आता समोर येत असून चौकशी यंत्रणेने केवळ यंदाच्या पेपरफुटीचीच नव्हे, तर मागील काळातील भानगडी व संशयास्पद बाबींचीही चौकशी करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपर्यंत रसायनशास्त्र विषयाचा शिकवणी वर्ग चालविणाऱ्या प्रा.कैलास राठोड यांनी केली.
25 वर्षांपूर्वी नांदेडमध्ये चौगुले-राठोड व इतर काही शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी राखत खाजगी शिकवणी वर्ग चालविले, नावारूपास आणले. गरीब पण होतकरू व हुशार विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘अर्था’ऐवजी त्यांनी आस्था राखली; पण मोटेगावकरांच्या नांदेड आगमनानंतर नांदेडमधील शिकवणी वर्गांच्या निकोप स्पर्धेला अनिष्ट वळण लागल्याचे संबंधितांकडून सांगितले जात आहे. मोटेगावकर यांना नांदेडला आणण्यात चौगुले यांनी मदतच केली; पण नंतर आपला अधिक विस्तार करताना त्यांनी बरेच उद्योग केल्याचे सांगितले जात आहे. अशा उद्योगांमुळेच त्यांच्यावर गंडांतर आले. मोटेगावकरांच्या झंझावातात काही जुने शिकवणी वर्ग बंद पडले किंवा मागे पडले.
नांदेडमधील अशोकनगर-भाग्यनगर ते आनंदनगर या मुख्य मार्गावर मोटेगावकर व इतर शिकवणी वर्गांनी वाढविलेले शैक्षणिक साम्राज्य त्या भागातील अनेक निवासी वसाहतींसाठी तापदायक ठरले, तरी या भागातील बऱ्याच घरमालकांना बाहेरून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचा व्यवसाय सुरू करता आला. अनेकांनी खानावळी सुरू केल्या. हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांचीही भरभराट झाली.
चौगुले यांच्या पूर्वीच्या चौगुले कोचिंग क्लासेसचे मागील काही वर्षांपासून ‘आयआयबी’ या मोठ्या संस्थेत रूपांतर झालेे. चौगुले हे आता त्यात नाहीत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सन्मानपूर्वक स्वेच्छानिवृत्ती घेतली. पेपरफुटीच्या भानगडीत मोटेगावकरांसह इतर काहींची नावे समोर येत असताना, चौगुले यांच्या संस्थेचे किंवा तिच्या विद्यमान संचालकांचे नाव कोठेही आलेले नाही. या संस्थेच्या संचालकानेही सखोल चौकशीचा आग्रह धरला आहे.
‘आयआयबी’च्या स्पर्धेत उतरलेल्या व या नावाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका संस्थेच्या बाबतीत मात्र संशय निर्माण झाला असून ‘नीट’ परीक्षा झाल्याझाल्या या संस्थेने आपल्या तीन विद्यार्थिनींची छायाचित्रे टाकून समाजमाध्यमांतून फिरवलेली जाहिरात आता वादग्रस्त झाली आहे. या जाहिरातीतील एका विद्यार्थिनीस सीबीआयच्या चौकशीस सामोरे जावे लागले आहे.
‘नीट’ परीक्षा झाल्या झाल्या आपला डंका वाजविण्यासाठी मोटेगावकर यांनी फैलावलेली स्वतःचीच ध्वनीचित्रफित त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा होत आहे. नांदेडमध्ये ‘आयआयबी’च्या स्पर्धेत उतरलेल्या एका शिकवणी वर्ग चालकाने आपल्या तीन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणार, असा दावा ठोकल्यामुळे संबंधिताच्या बाबतीत संशयाचे गरम वारे वाहत असले, तरी मोटेगावकरांच्या ‘आर.सी.सी.’खेरीज नांदेडमधील अन्य कोचिंग क्लासचालक सध्यातरी चौकशीच्या फेऱ्यात नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी येथे दिली.