नांदेड ः भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाला मराठवाड्याबद्दल अजिबात आस्था नाही, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले. वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीपासून नांदेडला होणाऱ्या महसूल आयुक्तालयापर्यंत अनेक विषय या नेतृत्वाने लोंबकळत ठेवले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत नांदेडचा समावेश जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत झाला होता. त्यातून नांदेडसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला; पण मोदी सरकार सत्तेवर येताच ही योजना बंद करण्यात आली.
देशात भाजपाचे सरकार आल्यापासून नांदेड अडगळीत पडले आहे. त्यामुळे नांदेडकरांचा भाजपावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. परिणामी स्थानिक नेतृत्वाने कितीही दावे केले, तरी या निवडणुकीत भाजपाचा बोऱ्या वाजणार हे निश्चित, असा ठाम विश्वास काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.8 मध्ये झालेल्या प्रचार सभेत खा.रवींद्र चव्हाण यांनी भाजपासह महायुतीतील अन्य घटक पक्षांवर निशाणा साधला. यावेळी श्याम दरक, हणमंत पाटील बेटमोगरेकर, अब्दुल सत्तार राजेश पावडे, फारुक अहमद, प्रशांत इंगोले, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा.रवींद्र चव्हाण म्हणाले, की नांदेडमध्ये महायुतीमध्येच कुरघोडी सुरू असून युतीचा नारा देणारे भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. महायुतीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल सुरू आहे. विकासाच्या थापा व गप्पा मारणारे नांदेडचा विकास करू शकणार नाहीत. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सक्षम आणि कटिबद्ध असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच आहे, असा दावा त्यांनी केला.
नांदेडचा मतदार जागरुक व अभ्यासू आहे. या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांना मतदार निश्चितच जागा दाखवतील. पुढील पाच वर्षांत नवतरुणाईच्या नेतृत्वात काँग्रेस शहराच्या विकासाला नवी दिशा देणार आहे, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीत दांडगा जनसंपर्क असलेले, विकासाची तळमळ असलेले उमेदवार दिले आहेत. त्यांना संधी देऊन मनपाची सत्ता काँग्रेस-वंचित आघाडीच्या हाती द्यावी, असे आवाहन खा.रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रभाग क्र. 8 मधील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.