विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम रद्द ! file photo
नांदेड

विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम रद्द !

नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयातील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Rashtrasevika Samiti's Program Cancelled Due to Opposition from Student Organizations!

नांदेड, पुढारी वृत्तेसवा : समाजवादी व डाव्या विचारसरणीतील दिग्गजांची संस्था अशी ओळख स्थापित केलेल्या येथील पीपल्स कॉलेजमध्ये संघ परिवारातील राष्ट्रसेविका समितीस सोबत घेऊन आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान सोहळ्यास वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली.

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणारे 'पीपल्स' हे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ. सुरेन्द्र बारलिंगे, गांजवे मामा, नरहर कुरुंदकर, म.द.पाध्ये, डॉ.ना.य.डोळे आदींनी नावारूपास आणलेल्या या संस्थेचा अमृतमहोत्सव अलीकडे साजरा झाला. पूर्वसुरींच्या पश्चात विद्यमान कारभाऱ्यांनी संस्थेच्या सभासदांमध्ये संघ-भाजपा परिव ारातील काहींना सामावून घेतले.

त्यांतील काहींचा संस्थेच्या कार्यकारी मंडळातही प्रवेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेविका समितीने पीपल्स कॉलेजला सोबत घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी या महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य शांभवी साले यांचा या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार होता.

या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर रिप ब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी आणि एसएफआय आदी संघटनांचे विद्यार्थी एकत्र आले. राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम या महाविद्यालयात होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनासमोर आक्रमकपणे मांडली.

हा कार्यक्रम उधळून लावण्याची तयारीही विद्यार्थ्यांनी केली होती. एकंदर परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला. भविष्यात या महाविद्यालयामध्ये आरएसएसशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असेही प्रशासनाला स्पष्ट करावे लागले.

विद्यार्थी आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिष ढगे, साई पाटील, प्रज्ञा साळवे, आदित्य कांबळे, प्रशांत गाडेकर, निखिल महाबळे यांच्यासह अनेक विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे पीपल्सच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता; पण परिस्थिती ओळखून प्रभारी प्राचार्यांनी कार्यक्रम रद्द केल्याची सूचना जारी केली. विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून पीपल्स कॉलेज वेगवेगळ्या घटना-घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर गाजत आहे. या महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसंबंधात विद्यापीठ कुलगुरूंकडे वेगवेगळ्या तक्रारी केल्या जात आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे. प्राचार्यपदावरून प्राध्यापकांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. यातील एका गटाने बुधवारच्या आंदोलनात पडद्यामागची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT