संजीव कुळकर्णी
नांदेड ः भारतीय जनता पार्टीने अडीच वर्षांपूर्वी अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे या भूमिपुत्रांना राज्यसभेवर पाठविल्यानंतर नांदेडचे जावई असलेले राजेंद्र हिरालाल जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर संधी दिली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जैन आपल्या सासुरवाडीस येणार असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा 27वा वर्धापनदिन साजरा होण्यापूर्वी या पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत संधी देत पक्षाने त्यांना ‘अधिकमासाची भेट’ दिली. जैन हे गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत. नांदेडमधील व्यावसायिक मदनलाल काला हे त्यांचे सासरे असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यातच राजेंद्र जैन नांदेडमध्ये आले होते; पण तेव्हा राज्यसभेसाठी त्यांचे नाव निश्चित झालेले नव्हते.
नांदेड जिल्ह्यात यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जामात यांनी विधानसभा व लोकसभेत प्रत्येकी दोनवेळा प्रतिनिधित्व केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सासुरवाडी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात आहे. भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर यांची सासुरवाडी नांदेड जिल्ह्यातच आहे. तसेच दिवंगत विनायक मेटे हेही नांदेड जिल्ह्याचे जावई होते. त्यानंतर राजेंद्र जैन यांचे नाव या परंपरेमध्ये समाविष्ट झाले आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह बीड जिल्ह्यातील अमरसिंह पंडित यांच्या नावांचा विचार झाला होता; पण शेवटी प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक असलेल्या जैन यांना उर्वरित कालावधीसाठी पक्षाने उमेदवारी दिली.
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांतील अनेक काँग्रेस कार्यकर्ते या नव्या पक्षामध्ये सहभागी झाले होते. त्यात राजेंद्र जैन यांचा समावेश होता. 2004 ते 2016 या कालावधीत त्यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले होते. तत्पूर्वी वरील दोन जिल्ह्यांतील विविध संस्थांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकीय व सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी दिली. तो बिनविरोध निवडून आला. त्याअगोदर पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ हेही राज्यसभेवर गेले. त्यानंतर पटेल यांनी आपल्याही एका समर्थकाची राज्यसभेवर वर्णी लावण्यात यश मिळविले. जैन यांच्या निवडीची औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे. पक्षाने संसदेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल बुधवारी त्यांनी आनंद व्यक्त केला.