

सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षातील निष्ठावंत नेतृत्व, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संपर्क यामुळे त्यांच्या नावाला मोठे वजन प्राप्त झाले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे तब्बल 25 वर्षे म्हणजे 1999 ते 2024 या कालावधीत प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागातील विकासकामे, सहकार क्षेत्रातील सक्रिय भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामुळे बाळासाहेब पाटील यांचे नेटवर्क सांगली जिल्ह्यातही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातही त्यांची ऊठबस असल्याने बाळासाहेबांचे नाव वेगाने चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सातारा सांगली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने व महाविकास आघाडीने बाळासाहेब पाटील यांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पाटील यांच्या नावावर महाविकास आघाडी अंतिम निर्णय घेऊ शकते, असे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळे राजकीय निर्णय घेतले असताना बाळासाहेब पाटील यांनी खा. शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे शरद पवार गटातील विश्वासू आणि निकटवर्ती नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान मानले जाते. सह्याद्री साखर कारखान्याच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे प्रभावीपणे सांभाळली आहे. शेतकरी आणि सहकार क्षेत्राशी असलेली जवळीक ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.
मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी राजकीय आणि सामाजिक कामकाजात खंड पडू दिला नाही. उलट कार्यकर्त्यांशी संवाद कायम ठेवत त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला. कराड नगरपालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत किंगमेकर म्हणूनही आपली छाप पाडली होती. याच पार्श्वभूमीवर सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.