Principal caught red-handed while accepting a bribe of Rs. 50,000
नांदेड, पुढारी वृत्तसेवा शालेय खर्चाचा दरमहा हप्ता, लिपिकाची बदली करून देणे आणि कोणतीही प्रशासकीय नोटीस न बजावण्यासाठी तब्बल ६० हजार - रुपयांची लाच मागणाऱ्या हुतात्मा माधव विद्यालय (मुखेड) च्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१, रा. शारदानगर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील ३८ वर्षीय - तक्रारदार हे मुखेड येथील हुतात्मा - माधव विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. मुख्याध्यापक राजेश पडलवार याने विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाने तक्रारदार यांच्याकडे प्रतिमहिना १२,००० रुपये प्रमाणे माहे जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या हप्त्याची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांची बदली करून देण्यासाठी आणि त्यांना कोणतीही नोटीस न देण्यासाठी एकूण ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने लिपिकाने याप्रकरणी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरताच एसीबीच्या पथकाने पडलवार याच्या शारदानगर येथील घराजवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक राजेश पडलवार याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
अटकेनंतर आरोपी मुख्याध्यापक पडलवार याची अंगझडती घेण्यात आली असता, त्याच्याकडे एक विवो कंपनीचा मोबाईल, सोन्याची अंगठी, ओळ-खपत्रे आणि ५,५०० रुपयांची रोकड आढळून आली. त्याचा मोबाईल जप्त करण्याची तजवीज करण्यात आली असून, एसीबीच्या पथकाद्वारे आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याप्रकरणी नांदेड येथील विमानतळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक पोलिस उप अधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर यांच्या पथकाने केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती प्रीती जाधव करत आहेत.
घरातच रचला सापळा
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ३ जून २०२६ रोजी तक्रारदार यांनी शासकीय पंचांसमक्ष मुख्याध्यापक पडलवार यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पडलवार याने तक्रारदार यांना नांदेड येथील शारदानगरमधील आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. तिथे झालेल्या पडताळणी दरम्यान, पडलवार याने शासकीय पंचांसमक्ष ६० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच "आता यापुढे तुला हप्ता देण्याची गरज नाही, यातच तुझी बदली करून घेतो" असे आश्वासनही दिले.