Police officer suspended for taking Rs 10 lakh by showing off his dream of becoming a police officer
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : तुमचे पोलिस होण्याचे स्वप्न मी साकार करतो, असे आमिष दाखवून उमेदवारांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेडचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कडक पाऊल उचलत संबंधित पोलिस अंमलदाराला तडकाफडकी निलंबित केले असून, त्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात आणि उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या नांदेड जिल्हा पोलिस दलात पोलिस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कडक शिस्तीत राबवली जात आहे. मात्र पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे (बक्कल क्रमांक २१६३) याने या प्रक्रियेला हरताळ फासला आहे. त्याने लेखी परीक्षेत मदत करण्याच्या नावाखाली काही उमेदवारांशी मोबाईलवर संपर्क साधून थेट पैशाची मागणी केली. प्राथमिक माहितीनुसार, या कर्मचाऱ्याने जवळपास दहा लाख रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. किमान तीन उमेदवारांकडून त्याने प्रत्यक्ष पैशाची मागणी केल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने शहानिशा केली.
तसेच महाराष्ट्र पोलीस पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागनाथ नागरगोजे याला महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम २५ आणि मुंबई पोलिस शिक्षा व अपील नियम १९५६ मधील नियम ३ अंतर्गत निलंबित केले आहे.
१९९ जागांसाठी ११ ते २३ फेब्रुवारीपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्रियेत जवळपास १४ हजार ६८२ उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर मैदानी चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या २ हजार ५५४ उमेदवारांची रविवारी १५ मार्च रोजी लेखी परीक्षा पार पडली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ही परीक्षा पार पडली.
त्यात सिसीटीव्हीच्या माध्यमातून उमेदवारांवर लक्ष ठेवण्यात आले होते. लेखी परीक्षेदरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र परी क्षेच्या आगोदर नागरगोजेंचा कारनामा पुढे आल्याने पोलीस अधिकारीही सावध झाले होते. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. कोणत्याही उमेदवाराने अशा भूलथापांना बळी पडू नये.
भ्रष्टाचाराचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे आवाहन करूनही पोलिस कर्मचारी नागरगोजेंनी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात उचलले पाऊल त्याला महागात पडले आहे. त्याचबरोबर प्रामाणिकपणे परिक्षेची तयारी करून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची या घटनेमुळे धाकधूक वाढली आहे. या घटनेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, भरती प्रक्रियेची विश्वासार्हता जपण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका घरी जाऊन देण्याची मुभा दिली शिवाय, ओएमआर सीटची कार्बन कॉपीपण उमेदवारांना घेऊन जाण्याची परवानगी दिली. तसेच लगेचच ऑनलाईन उत्तर टाकल्याने उमेदवारांना तातडीने आपण सोडविलेले उत्तर लगेचच तपासता येणार आहे आणि आपला काय निकाल लागेल हेही कळणार आहे.