Fire Pudhari
नांदेड

Nanded Petrol Pump Fire | उमरखेड येथे पेट्रोल पंप पेटविण्याचा प्रयत्न; बॅनरला आग लावणारा सीसीटीव्हीत कैद

चौकीदाराच्या सतर्कतेमुळे बॅनरची आग वेळीच विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Petrol Pump Fire Attempt

उमरखेड : उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सारडा पेट्रोल पंप पेटविण्याच्या उद्देशाने पंपाच्या तार फिनिशिंगला लावलेल्या बॅनरला आग लावल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री अडीचच्या सुमारास घडली. मात्र, चौकीदाराच्या सतर्कतेमुळे बॅनरची आग वेळीच विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बॅनरला आग लावणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरील चौकीदार अकबर खान हे रात्रीच्या वेळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना पंप परिसरातील बॅनरला आग लागल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ जवळ पडलेल्या बारदाना पोत्याच्या साहाय्याने आग विझविली. त्याचवेळी भगवा शेला परिधान केलेली अंदाजे ३५ वर्षीय व्यक्ती कारमधून तेथून निघून गेल्याचे चौकीदाराने सांगितले.

घटनेनंतर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात पांढऱ्या रंगाच्या डिझायर कारमधून एक व्यक्ती येऊन खाली उतरते आणि बॅनरला आग लावत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्ती मनोज बबन पोंगाने (वय अंदाजे ३५, रा. तांबोळीपुरा, उमरखेड) असल्याचे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थांचा साठा व विक्री केली जाते. त्यामुळे बॅनरला लावलेली आग पंपापर्यंत पोहोचून मोठी दुर्घटना घडण्याची तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पेट्रोल पंप पेटविण्याच्या उद्देशाने ही आग लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी पेट्रोल पंपमालक दिलीप पुरुषोत्तम सारडा (वय ६६, रा. हनुमान वॉर्ड, उमरखेड) यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३७/२०२६, कलम ३२६( ) जी बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे करीत आहेत. पोलिस अहवालानुसार, संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT