Opposition attacks government without studying: Bawankule
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८.३०६ कोटी रुपये इतका असणार आहे. याशिाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता १२ ३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे एक लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, अशी माहिती देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास न करताच विरोधी पक्षांचे नेते सरकारवर आगपाखड करीत असल्याचा टोला लगावला.
येथील शासकीय विश्रामगृहात वार्ताहर बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार, याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेग, भारतीय क्षमता आणि सबका साथ हे विकसित भारताचे तीन व्हीजन मांडले आहेत. देशात पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे. पर्वी जी केवळ एक लाख कोटी असायची.
पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी विशेष निधी दिला जाईल. शेती पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहे. महाराष्ट्रात पुणे-मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे १७० किमीचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार असून पुणे-हैद्राबादचा ५५० किमीचा प्रवास दोन तासांत पूर्ण होणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी. ३८ कोटी, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी १६७.२८ कोटी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ६४६. २४ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी ६१०३ कोटी, मुंबई मेट्रोसाठी १७०२ कोटी, समृद्धी मार्गावरील आयटीएससाठी ६८०७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून पायोफार्मा मिशन केवळ औषधांच्या किंमती नियंत्रण करणार नाही, तर भारताला जागतिक औषध निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
विकसित भारताकडे दमदार वाटचाल
महिला आणि युवा सक्षमीकरण, शिक्षण, शेतकरी, कृषी, औद्योगिक आदींच्या विकासासाठीही विविध तरतुदी करण्यात आल्या असून हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताकडे दमदार वाटचाल असल्याचे महसूलमंत्र्यांनी नमूद केले आहे.