तीन अट्टल दरोडेखोर जेरबंद, १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त! pudhari photo
नांदेड

Nanded Crime : तीन अट्टल दरोडेखोर जेरबंद, १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत ‘एलसीबी’ची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. महामार्गावर प्रवाशांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

वाजेगाव पुलाजवळ काही तरुण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सय्यद आरफात सय्यद हुसेन (२६), मोहम्मद मतीन ऊर्फ तंडी (२८) आणि शेख आरबाज शेख अजीज (२१, तिघे रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सायबर सेल व एलसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून आरोपींना रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अनेक गुन्हे उघडकीस

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी बिलोली-नरसी, नायगाव आणि मारताळा रस्ता परिसरात गेल्या दीड-दोन महिन्यांत लोकांना मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. या अटकेमुळे रामतीर्थ पोलिस ठाण्यातील दोन आणि नांदेड ग्रामीण ठाण्यातील एक, असे 'भारतीय न्याय संहिता' (BNS) अंतर्गत दाखल असलेले तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT