नांदेड ः जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 5) ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत एकाच वेळी धडक मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात मास रेड (सामूहिक छापे) टाकण्यात आले.
या धडक कारवाईत अवैध दारू, हातभट्टी, जुगार आणि गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर जोरदार प्रहार करण्यात आला असून, एकाच दिवसात 62 गुन्हे दाखल करत 63 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिसांनी एकूण 7 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा मैदानात
जिल्ह्यातून बेकायदेशीर धंदे हद्दपार करण्यासाठी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः या मोहिमेचे नियोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या मास रेडमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.
एकाच वेळी सर्वत्र छापे पडल्याने अवैध धंदेवाल्यांची एकच पळापळ झाली.पोलिस प्रशासनाने एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या या धाडसी मोहिमेमुळे जुगार अड्डे चालक, हातभट्टी माफिया आणि गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या तत्पर आणि कडक भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.
नांदेड जिल्ह्याला अवैध व्यवसायमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत केलेली ही कारवाई केवळ सुरुवात असून, आगामी काळात बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असणाऱ्यांवर यापेक्षाही तीव्र कारवाई केली जाईल. गुन्हेगारीला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही.अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड.