नांदेड : जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. राज मॉलच्या पार्किंगमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला शिताफीने अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन पिस्टल, 5 जिवंत आणि 1 रिकामे काडतूस, तसेच 5 मॅगझिन असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकूण तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व त्यांची पुरवठा साखळी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना दिले होते. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे पथक 4 जून रोजी पेट्रोलिंगवर असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.
राज मॉलच्या पार्किंगमध्ये एक तरुण बॅगेत गावठी पिस्तूल घेऊन ते विकण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची ती माहिती होती. पोलिसांनी वेळ न घालवता राज मॉलच्या पार्किंगमध्ये सापळा रचून छापा टाकला.
पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या गोपाळ ऊर्फ बिड्डु सुदर्शन चव्हाण (वय 21 वर्ष, रा. नमस्कार चौक, नांदेड) या तरुणाला ताब्यात घेतले. त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता, त्यात विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेली 2 लोखंडी गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 1 खाली काडतूस आणि 5 मॅगझिन मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला.
कारवाई करणारे पोलिस पथक
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, अंमलदार राजीव बोधगीरे, गोविंद राठोड, विठ्ठल वैद्य, साहेबराव कदम, गणेश यादव आणि चालक अकबर पठाण यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
कसून चौकशीत मुख्य पुरवठादारांची नावे उघड
आरोपी गोपाळ ऊर्फ बिड्डु याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ही शस्त्रे कुठून आणली, याबाबत कसून चौकशी केली. तेव्हा त्याने ही अग्निशस्त्रे व काडतुसे साईसिंग ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (रा. सिडको, नांदेड) आणि शेख शहारूख ऊर्फ कबुतर शेख अजगर (रा. खुदवेनगर चौरस्ता, नांदेड) यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पुरवठादारांनाही बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश यादव यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गु.र.नं. 258/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.