Only one teacher up to the eighth grade.
वसंत कपाटे
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : हडसणी केंद्राअंतर्गत येणाऱ्या इवळेश्वर येथील जि.प. शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तिथे मान्य पदांपैकी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने अतिदुर्गम व एकेकाळीच्या नक्षलग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शाळा सुरु होऊन सात महिने झाले आहेत. तरी शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न आजही जशास तसाच कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील वाडी, तांडा, पाडा व दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी व अठरापगड जातीच्या गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
तालुक्यात जि.प. च्या १२४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी प्राथमिक शिक्षकांची ३०९ पदे मान्य असून आजमितीस २२४ शिक्षक कार्यरत असून तब्बल ८६ पदे रिक्त आहेत. तसेच विस्तार अधिकारी १, केंद्रप्रमुख १०, पदवीधर (भाषा) १, पदवीधर (ग/वि) ७ अशा एकूण ११७जागा रिक्त आहेत. १६ शाळेवर तर शिक्षकच नाही.
शिक्षक नसलेल्या शाळेवर समायोजनातून शिक्षक पाठविले जात आहेत.-संतोष शेटकार गट शिक्षणाधिकारी, माहूर