Nanded Weather pudhari photo
नांदेड

Nanded Weather : दिवाळी तोंडावर, तरीही गुलाबी थंडीचा नाही आनंद

रब्बी पिकांना बसणार फटका!; धान्यांची साठेबाजी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड - यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने जमिनीत कोरडेपणा आणि हवेत उकाडा वाढला आहे. सध्या हवामानात प्रचंड बदल झाले असून ऑक्टोबर महिना हा १९०१ नंतरचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारीपर्यंत हवामानाची स्थिती हिच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे यावर्षी गुलाबी थंडीच्या आनंदाला मुकावे लागणार आहे. परिणामी रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र ’एल निनो’ या हवामान चक्रामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा थंडीचे दिवस खूप कमी असतील. जर एखादी थंडीची लाट आलीच, तर ती फक्त काही दिवसांपुरतीच मर्यादित राहील.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे नेहमीची गुलाबी थंडी जाणवणार नाही.त्यामुळे यंदा नागरिक उबदार कपड्यांऐवजी फॅन आणि एसीचाच वापर जास्त करताना दिसत आहेत.

यंदा थंडीचा कालावधी किमान २५ दिवसांनी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून हिवाळ्याचा प्रत्यक्ष प्रभाव नोव्हेंबरच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच मर्यादित राहू शकतो. नोव्हेंबर नेहमीपेक्षा जास्त उबदार राहील. हिवाळ्यांत थंड लहरी कमी येतील.

मध्येच उकाडा किंवा तापमानवाढ अनुभवण्यास मिळेल. पावसातील तुटीमुळे हवामान कोरडे राहील, ज्यामुळे दिवसा कडक ऊन व उष्णता राहील. केवळ रात्री थोडा गारवा असेल. एकंदरीत, यंदा कडक हिवाळा राहणार नाही. बदलत्या हवामानाचा गव्हासारख्या रबी पिकांवरही परिणाम होण्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

जीवनावश्यक वस्तू महागल्या

एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे दिवाळी सण अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंचे दर प्रचंड वाढले आहेत. गहू, ज्वारी, साखर, तेल, शेंगदाना, डाळी आदी वस्तुंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून व्यापार्‍यांनी आणखी दरवाढ होईल, असा अंदाज व्यक्त केल्यामुळे ग्राहकांनी आतापासूनच जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी सुरू केल्याचे दिसत आहे.

  • दरवर्षी हिवाळ्यामध्ये दिवाळीपूर्वीच उबदार कपड्यांचे नेपाळी व्यापारी जागोजागी कपड्यांचे स्टॉल लावत असतात. परंतु यंदा दिवाळी तोंडावर आली असतानाही उबदार कपड्यांचे स्टॉल दरवर्षईप्रमाणे बघायला मिळत नाहीत. त्यामुळे या वातावरणाचा मोठा फटका नेपाळी व्यापार्‍यांनाही बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT