विशेष प्रतिनिधी
नांदेड : निजामपूरवाडी, अर्धापूर तालुक्यातील एक दुर्लक्षित गाव. या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाचवी वर्गापर्यंतच्या शिक्षणाची सोय. पण केवळ दोन खोल्यांमध्ये पाच वर्ग चालवले जातात. खा.अशोक चव्हाण यांनी आणखी दोन खोल्यांसाठी निधी दिला; पण या खोल्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही!
खा.अशोक चव्हाण आणि खा.डॉ.अजित गोपछडे यांनी आतापर्यंत आपला स्थानिक विकास निधी अनुक्रमे भोकर आणि देगलूर विधानसभा क्षेत्रासाठीच प्रस्तावित केल्याची बाब नुकतीच समोर आली. खा.चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील वरील गावामध्ये वर्ग खोल्यांसाठी २६ लाख, शाळेपर्यंतच्या रस्त्यासाठी १५ लाख आणि याच गावातील किचन शेडसाठी ०५ लाखांचा निधी दिला; पण प्रशासकीय मान्यतेनंतर वरील गावामध्ये केवळ सिमेंट रस्ता आणि नालीचे काम पूर्ण झाल्याचे दिसून आले.
बारड येथील काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी मंगळवारी निजामपूरवाडी येथील वरील शाळेला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा खा.चव्हाण यांच्या निधीतील प्रस्तावित शाळा खोल्यांचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे दिसले. पण खासदारांच्या निधीतून दोन वर्गखोल्या बांधल्या जाणार आहेत, याची खबर शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत आली असल्याचे स्पष्ट झाले.
या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात आली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या निधीतून हनुमान मंदिर ते शाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वरील शाळेपर्यंत जाणे आता सुलभ झाले आहे.
वरील शाळा १९९४ साली सुरू झाली तेव्हा जि.प.ने दोन खोल्या बांधल्या होत्या. पाचवीपर्यंतचे वर्ग या दोन खोल्यांमध्ये चालतात. शाळेत २९ विद्यार्थी असून मुख्याध्यापक प्रमोद फुके यांच्याशिवाय मीनाक्षी भोंगे ह्या शिक्षिका तेथे कार्यरत आहेत.
खा.चव्हाण यांनी मुलांचा पोषण आहार तयार करण्यासाठी किचन शेडच्या कामालाही निधी दिला आहे. आधीचे शेड वार्यामुळे उडून गेल्यामुळे सध्या शाळेच्या बाहेरच पोषण आहार शिजवला जातो. या शाळेला पुरेसे मैदान नाही, असेही दिसून आले.
वरील गाव बामणी ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. सुमारे ५०० लोकसंख्येच्या या गावात ९० ते १०० कुटुंबे असल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले; पण हे काम कधी सुरू होणार, याची त्यांना माहिती नसल्याचे दिसून आले.
संदीपकुमार देशमुख यांनी वरील शाळेस प्रत्यक्ष भेट दिल्याची माहिती सर्व संबंधितांना कळाल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. काहींनी बांधकाम खात्याशी तसेच कंत्राटदाराशी संपर्क साधून वर्गखोल्यांचे काम कधी सुरू होणार, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वर्गखोल्यांचे काम गुणवत्ता राखून केले जावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. शाळेच्या निमित्ताने या एकाच गावासाठी ५० लाख रूपयांचा निधी दिला गेला आहे.
गोपछडेंचे वाचन; फडणवीसांचे श्रवण!
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे ज्येष्ठ बंधू आशीष फडणवीस गेल्या रविवार-सोमवारी नांदेडमध्ये होते. ह्या दौर्यादरम्यान त्यांनी खा.अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान खा.अशोक चव्हाण यांच्या खासदार निधीसंदर्भात ‘पुढारी’ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केलेली बातमी खा.गोपछडे यांनी फडणवीस यांना वाचून दाखविली. डॉ.संतुक हंबर्डे या ‘वाचन-श्रवण’ प्रसंगाचे मूक साक्षीदार होते.