विशेष प्रतिनिधी
नांदेड ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार होताच, राज्यामध्ये दोन गटांत विभागलेल्या या पक्षाच्या एकत्रीकरणाची चर्चा वृत्तवाहिन्यांनी सुरू केली. वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर हीच भावना व्यक्त केल्याचे दिसले. त्यानंतर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी काही ठिकाणी आघाडी केली. ती परिणामकारक ठरली नाही, तरी पुढील काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे काही जबाबदार नेत्यांकडून सांगितले जात होते. आता अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांनी एक व्हावे, यासाठी या पक्षाचे संस्थापक, खा.शरद पवार यांच्यासह त्यांचे जुने-नवे सहकारी तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून दबाव येऊ शकतो, असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना या पक्षाचा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक दबदबा होता; पण पक्षातील फुटीनंतर काही जिल्ह्यात या पक्षाची दयनीय अवस्था झाली. नगर परिषदांच्या निवडणुकीत या पक्षाच्या अजित पवार गटाने नांदेड जिल्ह्यात भाजपाच्या खालोखाल यश मिळविले. दोन्ही गट एकत्र असते, तर पक्षाला आणखी चांगली कामगिरी बजावता आली असती, असे कार्यकर्त्यांना वाटते.
अजित पवार यांच्या अकाली-अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षाचा कणा मोडला आहे. या पक्षामध्ये त्यांच्या तोलामोलाचा, निर्विवाद नेता नसल्यामुळे या पक्षाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांनी बुधवारी अजित पवार यांच्या निधनावर दिलेले आवश्यक ते स्पष्टीकरण वगळता कोणतेही भाष्य केलेले नाही; पण पुढील काही दिवसांत पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य एकत्र बसून विचारविनिमय करतील, असा अंदाज आहे. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’च्या भवितव्याची पुढील दिशा स्पष्ट होईल.
दिवंगत नेत्याच्या अंत्यविधीप्रसंगी दोन्ही पवारांचे महत्त्वाचे सहकारी उपस्थित होते. पण अनेकांनी तेथे तातडीने जाणे टाळले. पुढील दहा-बारा दिवसांत अनेकजणं शरद पवार यांना भेटतील, आपली भावना त्यांना सांगतील, असा अंदाज आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या अंत्यविधीस उपस्थित असलेल्या जनसमूहात आणि नेत्यांच्या गर्दीमध्ये नांदेड जिल्ह्यातून अनेकजणं उपस्थित होते. आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी बारामतीतही आपली शोकसंवेदना व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण बुधवारी दिल्लीहून निघाले. पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून आपल्या जुन्या सहकाऱ्यास श्रद्धांजली वाहिली.
नांदेडहून ‘राष्ट्रवादी’चे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते बारामतीला गेले होते. त्यांतील बऱ्याच जणांनी बुधवारी रात्री आपल्या लाडक्या नेत्याच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील, कमलकिशोर कदम, डॉ.माधव किन्हाळकर यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जीवन घोगरे पाटील यांनी आपण मोठा आधार गमावल्याचे म्हटले आहे.