खानापूर : नरसी ते देगलूर राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या महामार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीकडून टोलवसुली मात्र नियमित आणि जोमात सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालक आणि नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रुग्णवाहिका, शालेय बस तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तसेच याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने लक्ष घालून नरसी–देगलूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व खड्डे बुजवावेत, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघातांचा धोका वाढत आहे. वाहनांचे नुकसान, प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ टोलवसुलीवर भर न देता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील आता केली जात आहे.