वरिष्ठांच्‍या जाचाला कंटाळून शिक्षकाने मुलांसह जीवन संपवले pudhari photo
नांदेड

Nanded Crime : वरिष्ठांच्‍या जाचाला कंटाळून शिक्षकाने मुलांसह जीवन संपवले

व्हॉट्सॲपवर स्टेट्स‌ ठेवून गोदावरीत घातली कार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : गेली दोन वर्षे वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि चौकश्यांच्या त्रासाला कंटाळून एका जिल्हा परिषदेच्‍या शिक्षकाने आपल्या १४ व ११ वर्षांच्या दोन निष्पाप मुलांसह कार गोदावरी नदीत टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. नांदेड शहरालगतच्या मुदखेड तालुक्यातील आमदुरा पुलावर ही हृदयद्रावक घटना घडली. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून गटशिक्षणाधिकारी (BEO) आणि इतर अधिकाऱ्यांच्या जाचाचा पाढा वाचल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सुनील नारायण मोरे (रा. टेंबर, ता. भोकर, ह.मु. सांगवी गोपाळनगर, नांदेड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा (वय १४) आणि मुलगा सुमित (वय ११) या दोन चिमुकल्यांचाही अंत झाला आहे. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा हळहळला आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी किशन पाेले, विस्तारअधिकारी सूर्यकांत बाच्चे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम व दत्ता पवळे या चारजणांविराेध गुन्‍हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मोरे हे पत्नी व मुलांसह सांगवी परिसरात राहत होते. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ‘मुलांना शाळेत सोडतो’ असे सांगून ते कार घेऊन घरून निघाले. मात्र, शाळेत जाण्याऐवजी त्यांनी आपली कार मुदखेड तालुक्यातील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटाकडे वळवली. पुलावर पोहोचताच, क्षणार्धात त्यांनी दोन्ही मुलांसह कार थेट गोदावरीच्या अथांग पात्रात झोकून दिली. यामध्ये तिघांचाही जागीच बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्र खोल असल्याने कार शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अथक परिश्रमानंतर कार आणि तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. दुपारी शवविच्छेदनासाठी तिन्‍ही मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून दोन निष्पाप जिवांच्या बळीमुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. शिक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असले तरीही या दोन निष्पाप मुलांचा यात काय दोष? असा प्रश्न समाजासमोर उपस्थित झाला आहे.

व्हॉट्सॲप स्टेट्स‌ ठरले ‘डेथ नोट’!

​शिक्षक सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवलेले स्टेटस अत्यंत बोलके आणि यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हदगावचे गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलांसह आत्महत्या करीत आहे. मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी माझी चौकशी लावून छळ केला जात आहे. असे म्‍हटले असून ​या स्टेटसमध्ये त्यांनी दोषी अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख केल्याचे समजते. एका शिक्षकाला आपल्या मुलांसह जीव द्यावा लागतो, यावरून शिक्षण विभागातील अंतर्गत राजकारण आणि त्रासाची पातळी किती भयानक असेल, याची कल्पना येते.

सहकाऱ्याला फोन

धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी मोरे यांनी आपल्या शिक्षक सहकाऱ्याला फोन केला होता. ‘माझ्याकडे अधिकाऱ्यांविरुद्ध भक्कम पुरावे आहेत,’ असे त्यांनी सांगितले. त्यावेळी सहकाऱ्याने त्यांना धीर देत, ‘आपण कायदेशीर लढा देऊ, टोकाचा निर्णय घेऊ नका,’ अशी विनवणी केली होती. मात्र, मानसिक छळामुळे खचलेल्या मोरे यांनी काही वेळातच हे भयानक पाऊल उचलले.

निष्पाप चिमुकल्यांचा काय दोष?

​या संपूर्ण घटनेत १४ वर्षांची सारा आणि ११ वर्षांचा सुमित या दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. वडिलांनी रागाच्या आणि नैराश्याच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य फुलण्याआधीच कोमेजून गेले. ‘वडील आपल्याला शाळेत सोडायला चालले आहेत,’ याच भावनेत ती मुले कारमध्ये बसली असतील. पण, त्यांना काय माहीत की त्यांचे वडील त्यांना मृत्यूच्या दारात घेऊन जात आहेत. वडिलांनी जरी टोकाचे पाऊल उचलले असले तरी यात या दोन निष्पाप चिमुकल्‍यांचा काय दोष असा प्रश्न उपस्‍थित होत असून ही घटना समाज मनाला विचार करायला भाग पाडणारी आहे. या चिमुकल्यांच्या मृत्यूने उपस्थित गावकऱ्यांच्‍याही काळजाला पाझर फुटला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने अनेकांचे डोळे पाणावले होते.

SCROLL FOR NEXT