Nanded zp school admission student unique initiative
राजेंद्र कांबळे
बिलोली: इंग्रजी व खासगी शाळेतील विध्यार्थ्यांची वाढणारी संख्या पहाता डबघाईस गेलेल्या जि.प.च्या शाळांचे पुनर्जीवन करण्यासाठी बिलोली तालुक्यासह जिल्हायातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे.
जि.प.च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी माफ करण्याचा ठराव घेतला. पण नांदेड मुक्कामी राहून अपडाउन करणारे शिक्षक हे या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतील काय? असा प्रश्न आहे.
गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः, गुरूर साक्षात परब्रम्ह, तस्मई श्री गुरवे नमः हा एक प्रसिद्ध श्लोक आहे, जो गुरुच्या गौरवाचे वर्णन करतो. पण त्याऊलटची प्रतिमा गुरूंची अर्थात शिक्षकांची पहावयास मिळत आहे. शासनाची गलेल्लठ्ठ पगार असणाऱ्या शिक्षकांनी विद्याथ्यएिवजी स्वतःच्या सुख-सुविधांकडे लक्ष दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बिलोली तालुक्यातील जि.प. च्या शाळेमधील बहुतांश शिक्षक हे मुख्यालयी न राहता नांदेड येथे मुक्कामी राहून अपडाउन करीत आहेत. परिणामी शाळेला उशिरा येणे व लवकर जाणे ही बाब नित्याचीच बनली आहे.
नांदेड ते बिलोली असा १५० कि.मि.चा प्रवास करणाऱ्या शिक्षकांना शारीरिक थकवा आल्यास वर्गातच डुलकी मारताना अनेकदा निदर्शनास आलेले आहे. तर काही शिक्षक हे मनोरंजन म्हणून व्हाट्सअप चॅटिंग व यु ट्यूब वरील रील पहात बसतात. याबाबतचे जिल्ह्यातील अनेक व्हीडिओ समाज माध्यमावर प्रसारित होत असतात. शिक्षकांच्या अशा बेजबाबदार वृत्तीमुळे जि.प. शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला गेला. परिणामी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत व खासगी शाळेत टाकण्याचा सपाटा लावला.
त्यामुळे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असून, या शाळा डबघाईस आल्या आहेत. पटसंख्यांअभावी शासनाला अनेक शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.
पटसंख्ये अभावी आपल्या गावची शाळाही बंद पडणार, या धास्तीमूळे आता काही ग्राम पंचायतींनी जि.प. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव घेतला. पण ज्या शिक्षकांचे नांदेड येथून अप-डाउन सुरु आहे, त्याचे काय ते जि.प.शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतील काय? याचे उत्तर मात्र ना ग्रामपंचायत सदस्यांकडे आहे, ना शिक्षण विभागाकडे आहे? त्यामुळे अशा उपाययोजनांमुळे खरोखरच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढेल काय, असा प्रश्न पालसमोर उपस्थित होत आहे.