Bike theft gang arrested Pudhari
नांदेड

Nanded Crime | नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी, मोटार पंप चोरणाऱ्या टोळीला अटक : ५ जण गजाआड; ५.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

१२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Bike theft gang arrested

उमरखेड : नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी तसेच शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ दुचाकी व ९ पाण्याचे मोटार पंप असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तब्बल १२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरी, शेती अवजारे चोरी व अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई सुरू करण्यात आली.

दि. २ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी करणारे आरोपी अंबोना धरणाजवळील रेस्ट हाऊस परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून साजिद खान वाजिद खान, शेख उमेर शेख मुजीब, मोहम्मद रेहान मोहम्मद रफिक (सर्व रा. उमरखेड), श्रीकांत ऊर्फ शेरा बालाजी सूर्यवंशी (रा. माळसावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) तसेच एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपींनी उमरखेड, महागाव, दराटी, वणी तसेच हदगाव (जि. नांदेड) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण १३ दुचाकी व विविध कंपन्यांचे पाण्याचे मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल भंगार व्यावसायिक शेख कादीर शेख ख्वाजा (रा. रजानगर, हदगाव, जि. नांदेड) यास विक्री केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

या कारवाईत हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो दुचाकी, ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे पाण्याचे मोटार पंप, सौरऊर्जा पंप, पाईप, केबल व स्प्रिंकलर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, रविंद्र शिरामे तसेच मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे व राजेश जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT